मंगेश खिलारी
देशात सर्वात अवघड समजली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत इशिता किशोर हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच यूपीएससीच्या पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेत पुण्यातील विद्यार्थी मंगेश खिलारी याने ३९६ वा क्रमांक मिळवला आहे.
मंगेश खिलारी हा पुणे जिल्ह्यातील संगमनेर येथील सुकेवाडीचा मूळचा रहिवासी आहे. घरची परिस्थिती बेताची असताना देखील मंगेश हा पुण्यामध्ये चार वर्षांपासून यूपीएससीची तयारी करत होता. तो पुण्यातील युनिक अकॅडमीमध्ये तयारी करत होता. मंगेशने याआधी देखील यूपीएससीसाठी तयारी करत असताना दोनदा प्रयत्न केला होता.
मात्र, सुरूवातीच्या दोन प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही. परंतू, आपण यशस्वी होणार अशी इच्छा मनाशी बाळगून मंगेशने तिसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रयत्न केला. अखेर युपीएससीत बाजी मारून हे यश आपल्या नसून आपल्या आई-वडीलांचे असल्याचे मंगेशने सांगितले.
सिविक मिररशी बोलताना मंगशे म्हणाला की, “पहिल्यांदा माझ्या मित्राने निकाल पाहिला आणि मला सांगितले. तेव्हा त्यावर माझा विश्वास बसला नाही. यामुळे मी स्वतः वेबसाईटवर जाऊन निकाल तपासला. तेव्हा मला स्वतःवर विश्वास बसला. मला जशी संधी मिळेल तसे मी काम करणार आहे. मात्र ग्रामीण भागातील विकास करण्यामध्ये मला जास्त रस आहे.”