'पुण्यदशम' चे पुण्य संपले
राजेंद्र चोपडे
rajendra.chopade@civicmirror.in
पीएमपीच्या ताफ्यातील ‘पुण्यदशम’ गाड्यांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या गाड्या संचलनातून कायमस्वरूपी काढून टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या केवळ नऊ गाड्यांद्वारे पेठांसह मध्यवर्ती भागातील प्रवाशांना सेवा दिली जात असून उपनगरांतील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
शहरातील पेठांसह मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते लक्षात घेऊन पीएमपीकडून पुण्यदशम सेवा सुरू करण्यात आली आहे. दहा रुपयांत ही सेवा दिली जात होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. सध्या पीएमपीच्या ताफ्यात अशा ५० गाड्या होत्या, पण त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र ८ जुलै रोजी संपले. त्यामुळे या गाड्या प्रवासी सेवेतून वजा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी शनिवारी (१५ जुलै) फक्त नऊ गाड्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
पुण्यदशमच्या मिडी बस ताफ्यात आल्यानंतर या बसचे मार्गावर योग्यप्रकारे नियोजन झाले नाही, असा दावा काही अधिकाऱ्यांकडूनच केला जात आहे. डिझेलवरील इंजिनामुळे या बस प्रवाशांचा वाढीव भार सहन करू शकल्या नाहीत. तसेच लांब पल्ला आणि घाटमार्गावरही बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे या बस सातत्याने नादुरुस्त होत होत्या, तर काही बसच्या इंजिनची कामे सतत निघत होती. त्यामुळे एक-एक बस प्रवासी सेवेतून बाहेर पडू लागली. मागील पाच वर्षात अनेक बसचे इंजिन फेल झाले. काही इंजिन दुरुस्त करून या बस मार्गावर आणण्यातही आल्या, पण सातत्याने इंजिन बंद पडू लागल्याने अशा तब्बल ५० बस कायमच्याच बंद ठेवण्यात आल्या. उर्वरित जवळपास ५० बस पुष्पक सेवा, मालवाहतूक, ब्रेकडाऊन बसची ने-आण करणे आदी कामांसाठी वापरल्या जात आहेत. या बस प्रवासी सेवेत नाहीत, तर २५ ते ३० बस दररोज विविध दुरुस्ती कामांसाठी वर्कशॉपमध्ये उभ्या असतात. बहुतेक गाड्यांच्या इंजिनचीच कामे आहेत. त्यामुळे केवळ पाच वर्षांतच सव्वाशेहून अधिक बस ताफ्यातून बाहेर पडल्याने पीएमपीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
फिटनेस प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित कंपनी त्यांच्या पोर्टलवरून गाड्यांची ऑनलाइन केवायसी आणि व्हीएलडीटी प्रमाणपत्र देणार आहे. कंपनीकडून ही प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर पीएमपीकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला ती सादर केली जाणार आहेत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे कंपनीकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यास पीएमपीला विलंब होत आहे. त्यामुळे या गाड्या संचलनात येण्यास अडचणी निर्माण झाल्या असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, साध्या गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपीच्या अभियंत्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'सीविक मिरर' सांगितले, येत्या काही दिवसांत पुण्यदशम गाड्या टप्प्या-टप्प्याने संचलनात येतील, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. बुधवारी (१९ जुलै) ११ गाड्यांना फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित गाड्यांना २२ जुलैपर्यंत प्रमाणपत्र प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली.