केरळा स्टोरी चित्रपटाच्या विरोधात निदर्शने
पुण्यातील एफटीआयआयमध्ये “द केरळा स्टोरी” चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. मात्र, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या एका गटाने या चित्रपटाला विरोध केला असून स्क्रीनिंग बंद पाडल्याचा प्रयत्न केला होता. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. मिती फिल्म सोसायटीने या विशेष शोचे आयोजन केले होते.
एफटीआयआयमध्ये शनिवारी सकाळी “द केरळा स्टोरी” चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणास्तव चंद्रकांत पाटील हजर राहिले नाहीत. अशातच या कॅम्पमध्ये गेल्या पाच दिवासांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहेत. एफटीआयआयमधील २०२० च्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे या कारणास्तव काढून टाकल्याने हे उपोषण सुरू आहे.
त्यात आज स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. मात्र, स्क्रीनिंग चालू होण्याआधीच काही विद्यार्थ्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला स्पेशल स्क्रीनिंगबद्दल सांगण्यात आलेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर अभिनेते योगेश सोमण यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना कॅम्पसच्या बाहेर काढण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तातच या सिनेमाचे स्क्रीनिंग पार पडले आहे.