संग्रहित छायाचित्र
पदवी पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक वर्षातील सत्र वैधता संपल्याचे कारण देत विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवीचे अंतिम वर्ष राहिलेल्या विद्यार्थ्यांचे पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर (पीआरएन) क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना हिवाळी सत्र परीक्षेला बसता येत नाही. पीआरएन क्रमांक अनब्लॉक करावा आणि परीक्षेची संधी द्यावी, या मागणीसाठी विद्यापीठातील मुख्य इमारतीजवळ विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत उपोषणाला सुरुवात केली आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांनी परीक्षा संचालकांसह कुलगुरूंना निवेदन दिले आहे. त्यानुसार, २०१४-१५ ते २०१७-१८ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी अंतिम वर्ष पूर्ण असून, त्यांचे काही विषय बॅकलॉग आहेत. काही विद्यार्थ्यांनी यंदा अंतिम वर्षात प्रवेश घेतला आहे. वैयक्तिक, आर्थिक तसेच कोविडकाळातील परिस्थितीमुळे पदवी पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार निश्चित कालावधीत पदवी पूर्ण करता आलेली नाही. दरम्यान, २०२३-२४ मध्ये पहिल्यांदाच अचानकपणे विद्यापीठाकडून पीआरएन ब्लॉक करण्यात आले. त्यापूर्वी कॉलेज, विद्यार्थ्यांना पीआरएन वैधतेबद्दल माहिती देण्यात आली नव्हती.
आंदोलक विद्यार्थी ऋषिकेश बडगुजर म्हणाले, ‘‘मी २०१७-१८ मध्ये अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेतला. प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक अडचणींमुळे अभ्यासक्रम अर्धवट सोडावा लागला होता. त्यानंतर, २२-२३ मध्ये द्वितीय तर २०२३-२४ मध्ये तृतीय वर्ष उत्तीर्ण झालो असून, यंदा २०२४-२५ मध्ये माझे चौथे अंतिम वर्ष आहे. मात्र, माझा पीआरएन ब्लॉक केला आहे. माझे शैक्षणिक भवितव्य अंधारात गेले आहे.’’
‘‘आमचे अगोदरच प्रवेश झालेले आहेत. आम्हाला अंतिम वर्षासाठी पीआरएन ब्लॉक करून पाहिजे आहेत. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही सर्व विद्यार्थी चर्चा करण्यासाठी गेलो असता त्यांच्याकडून असे सांगण्यात येत आहे की तुम्ही आत्महत्या केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. अशा पद्धतीने जर विद्यापीठ शासन आमच्या सोबत वागणार असेल तर आमचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण,’’ असा सवाल छाया लोंढे या विद्यार्थिनीने उपस्थित केला.
पीएचडी संशोधक आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे म्हणाले, ‘‘उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने दडपशाही केली गेली. विद्यापीठाच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचा बॅनर काढून टाकला. विद्यापीठ प्रशासन वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी अशा पद्धतीने जर सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणार असतील तर हे आम्ही खपवून घेणार नाहीत. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत आहोत.’’
विद्यार्थिनी उमा मुंडे म्हणाल्या, ‘‘आमचा पीआरएन ब्लॉक केला असून आम्हाला परीक्षा फॉर्म भरू दिला जात नाहीय. या सर्व आमच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? आम्ही चार महिन्यांपासून रोज विद्यापीठात येत असून फक्त आश्वासन दिले जात आहे. आम्ही वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाला याबाबत विचारायला गेलो असता ‘तुम्ही तिकडे आंदोलन करा की आत्महत्या करा. आम्हाला काही घेणं देणं नाही,’ अशी उत्तरे आम्हाला मिळाली. त्यामुळे आता आमच्यावर उपोषणाची वेळ आली असून जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही."
या संदर्भात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, परीक्षा आणि मूल्यमापन संचालक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.