पीएम श्री योजनेत राज्यातील ८२७ शाळा

केंद्र सरकार पुरस्कृत पीएम श्री योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात ५१६ शाळा तर दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळांची निवड झाली आहे. या सर्व ८२७ शाळांमध्ये पीएम श्री उपक्रमाची सुरुवात येत्या १८ तारखेपासून होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 14 Nov 2024
  • 03:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील २३ शाळा सामील, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक प्रत्येकी २६ शाळांचा समावेश

केंद्र सरकार पुरस्कृत पीएम श्री योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात ५१६ शाळा तर दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळांची निवड झाली आहे. या सर्व ८२७ शाळांमध्ये पीएम श्री उपक्रमाची सुरुवात येत्या १८ तारखेपासून होणार आहे.

या योजनेमध्ये नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक प्रत्येकी २६ शाळांचा समावेश करण्याता आला आहे.  त्याखालोखाल पुण्याच्या २३ शाळांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील कल्पकतेला वाव मिळणार आहे. १८ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. ५१६ सरकारी शाळादेखील पीएम श्री योजनेमध्ये विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के निधी खर्च केला जाणार आहे. प्रत्येक शाळेसाठी सुमारे १ कोटी ८० लाख रुपये निधी मिळणार आहे. या शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श, मॉडर्न शाळा आणि केंद्रीय विद्यालयाच्या शाळांच्या धर्तीवर शैक्षणिक विकासाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

पीएम श्री योजनेंतर्गत विद्यावैभव (ऑलिम्पियाड), मंथन मंडळ वादविवाद संघ (डिबेट क्लब), डिजिटल शोध (डिजिटल क्वेस्ट), स्थानिक परिसराचा अभ्यास करणे (डिस्कवर अँड लर्न लोकल साइट) आदी उपक्रमांची पुढील २५ दिवसांत अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. चिकित्सक विचार, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थ्यांना शाळा, जिल्हा आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल.

या उपक्रमांच्या माहितीची पीएम श्री शाळांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट टाकावी लागणार आहे. यामुळे या योजनेविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल. पालिकांनी पीएम श्री शाळांमध्ये अंमलबजावणी केलेल्या उपक्रमाची अद्ययावत माहिती गुगल ट्रॅकवर भरावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शाळांची जिल्हानिहाय संख्या

पुणे २३, अकोला ११, अमरावती १८, छत्रपती संभाजीनगर ११, बीड १३, भंडारा १२, गोंदिया १३, हिंगोली ५, जळगाव १८, लातूर १३, नागपूर २१, नांदेड १८, नंदूरबार ८, पालघर १, परभणी ११, बुलडाणा २२, चंद्रपूर १८, धाराशिव ९, नगर २१, गडचिरोली १६, कोल्हापूर १८, नाशिक २६,  रायगड २०, रत्नागिरी १३, सांगली १४, सातारा  १८, सिंधुदुर्ग १३, सोलापूर २३, ठाणे १४, वर्धा १३, वाशिम ७, यवतमाळ २६, धुळे ७, जालना १२.

उपक्रम वेळापत्रक

पूर्वतयारी - १८ ते २२ नोव्हेंबर

शालेय स्तरावरील उपक्रम - २६ ते २९ नोव्हेंबर

जिल्हास्तर स्पर्धा - ४ ते ९ डिसेंबर

राज्यस्तरीय स्पर्धा - १० ते १२ डिसेंबर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest