समाजात सुसंवाद राखायचा असेल तर क्रीडासंस्कृती वाढीस लागायला हवी – सिद्धार्थ शिरोळे

पुणे, दि. १४ नोव्हेंबर, २०२४ : पुणे शहरात क्रीडासंस्कृती टिकून ठेवण्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. समाजात सुसंवाद राखायचा असेल तर क्रीडासंस्कृती वाढीस लागायला हवी असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 14 Nov 2024
  • 02:15 pm

शिरोळे यांच्या हस्ते चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण

पुणे : पुणे शहरात क्रीडासंस्कृती टिकून ठेवण्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. समाजात सुसंवाद राखायचा असेल तर क्रीडासंस्कृती वाढीस लागायला हवी असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. पीवायसी हिंदू जिमखाना येथे स्पोर्ट्स व फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना शिरोळे यांच्या हस्ते नुकतेच चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

शिवछत्रपती लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार विजेते, ज्येष्ठ बॉडी बिल्डर डॉ अरुण दाते, विविध क्षेत्रातील खेळाडूंसाठी मानसिक सल्लागार (मेंटल कोच) म्हणून कार्यरत असलेले स्वरूप सवनुर, प्रसिद्ध क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ आनंद गंगवाल, भारतीय फुटबॉल टीमचे माजी व्यवस्थापक मंदार ताम्हाणे, खेळाडू आशिष कसोदेकर, सायकलिस्ट डॉ अविनाश फडणीस, पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले बॉक्सर व प्रशिक्षक मनोज पिंगळे, चॅम्पियन्स स्पोर्ट्सचे अमित मदान, आयोजक आनंद पांड्या आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आजही धकाधकीच्या जीवनात खेळासाठी वेळ देण्याचा प्रयत्न मी करतो असतो, असे सांगत सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, खेळाडू यांसोबत वेळ घालवला की एक वेगळीच उर्जा मिळते, म्हणून खेळाविषयी आपुलकी असणाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवे. समाजातील एकोपा आणि सुसंवाद यामुळे टिकून राहील.” आज पुणे शहरात सर्वच खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले आणि काम केलेलं, खेळाडू व प्रशिक्षक आहेत ही शहराची संपत्ती असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.

या आधी व्यासपीठावर उपस्थितांनी शहरातील खेळाच्या संस्कृतीबद्दल आणि सद्य परिस्थितीबद्दल आपली मते मांडली. शहरात स्पोर्ट्स कम्युनिटी वाढत असली तरी खेळाची संस्कृती रुजायला आणखी थोडा वेळ जावा लागेल असे आशिष कसोदेकर म्हणाले. आज मॅरेथॉनमध्ये धावणारे १० हजार खेळाडू असले तरी त्यांना प्रोत्साहन देणारे मोजकेच दिसतात असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

कोणत्याही क्रीडाप्रकारात यश मिळवायचे असेल तर मानसिक आरोग्य महत्त्वाचे असून याची जाणीव आता पालक आणि पाल्य दोहोंमध्ये वाढत आहे, असे स्वरूप सवनुर यांनी सांगितले. खेळाची संस्कृती वाढीस लागायची असेल तर खेळाडूंना पायाभूत सोयीसुविधा, प्राथमिक प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज मंदार ताम्हाणे यांनी अधोरेखित केली.

मागील २० वर्षांचा विचार केल्यास आज खेळाडूंना पालकांकडून मिळत असलेला पाठींबा हा महत्त्वाचा ठरत असून मागील पाच वर्षात खेळांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या शाळा, विद्यापीठे यांमध्ये होत असलेली वाढ हा सकारात्मक बदल आहे असे अमित मदान यांनी नमूद केले. आज खेळाचा विचार केल्यास पुणे देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये असून नजीकच्या पाच वर्षांमध्ये पहिल्या तीन शहरांमध्ये पुणे स्थान पटकावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खेळामध्ये प्रशिक्षक व फिजिओथेरपिस्टचे महत्त्व डॉ गंगवाल यांनी अधोरेखित केले. रणजीत नातू यांनी बॅडमिंटन खेळाचा प्रवास सांगत काही खेळाडूंच्या कामगिरीने कशा पद्धतीने खेळाला फायदा होऊ शकतो याची उदाहरणे दिली. डॉ फडणीस यांनी खेळातील सातत्य आणि आनंद घेण्याची प्रक्रिया आयुष्यात महत्त्वाची असते असे सांगितले. बॉक्सिंग क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत बॉक्सिंग संघटनांचा अनुभव पिंगळे यांनी विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य राठी यांनी केले व आभार मानले.

 चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कार कार्यक्रमात शिरोळे यांचे स्वागत करताना अमित मदान. फोटोत (डावीकडून) डॉ अविनाश फडणीस, रणजीत नातू, डॉ आनंद गंगवाल, डॉ अरुण दाते, शिरोळे, मदान, मंदार ताम्हाणे, स्वरूप सवनुर, आशिष कसोदेकर आणि मनोज पिंगळे. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सदर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कार कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधताना  शिरोळे. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सदर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते आनंद पांड्या यांना चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी फोटोत (डावीकडून) डॉ आनंद गंगवाल, आनंद पांड्या आणि शिरोळे. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सदर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest