पुणे : ‘घरे मालकी हक्काने करुन घेणारच’ पर्वतीमधील पदयात्रेत अश्विनी कदम यांचा दावा
पुणे : इंदिरा नगर लोअर, अप्पर व सुप्पर, निलकमल सोसायटी, शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी चव्हाण नगर, छत्रपती संभाजी नगर येथील ९९ वर्षाची मुदत असलेल्या घरांचे मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आणि अंदाजे ७ हजार घरांचे व रहिवासी नागरिकांची गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपण एकदा संधी दिल्यास पर्वतीकरांच्या सर्वासमावेशक प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवून ‘घरे मालकी हक्काने करुन घेणारच.’ असा शब्द महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी दिला.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ३७ अप्पर-सुप्पर, इंदिरानगरमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चिंतामणी नगर भाग १-२, महेश सोसायटी, चिंतामणी नगर भाग ३, गॅस गोडावून, पीएमटी कॉलनी, शिवतेज नगर, खडके वस्ती, सरगम चाळ, पद्मावती नगर, पवन नगर साईनगर, अंबिकानगर, बिलाल मस्जिद, शिवराय नगर, पीएमटी डेपो आदी भागातील मतदार महिला नागरिकांची संवाद साधला. यावेळी अश्विनी कदम म्हणाले की, ‘आपल्या पर्वतीच्या निष्क्रिय आमदारांमुळे या भागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मागील पंधरा वर्ष आश्वासन देऊनही मार्गी लागलेले नाहीत. पुण्यात घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. पण, घर असतानाही त्याची मालकी नावावरच नसेल तर कुटुंब प्रमुखाची काय अवस्था होते, याची जाण आश्वासन देणाऱ्या निष्क्रिय आमदारांना काय कळणार? घरांची मालकी हस्तांतर प्रक्रिया सुलभ व कमीत कमी फी आकारून त्वरित करण्यासाठी पुणे महानगर पालिकेला त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडणार. घरांचे वारसा हक्काने हस्तांतर प्रक्रिया त्वरित निर्णय अंमलबजावणी करून घेणार तसेच झालेले वाढीव बांधकाम नियमित करण्याचा प्रश्न मार्गी लावणार असून सतत तुंबणारे ड्रेनेज व कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची गंभीर समस्या अग्रक्रमाने सोडविणार असल्याचे मत अश्विनी कदम यांनी मांडले.
यावेळी पदयात्रेदरम्यान माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, बंडू नलावडे, शशिकांत तापकीर, विजय मोहिते, गणेश मोहिते, सतीश पवार, अमोल परदेशी, स्नेहा परदेशी, आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.