संग्रहित छायाचित्र
पुणे : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश तसेच मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शहरातील बांधकाम व्यवसायिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकेने आदेश देवून या नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहारातील सहा बांधकाम व्यवसायिकांना नोटीस देण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढल्याने हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्तात आले आहे. पुण्यातील हवा अधिक प्रदूषित असल्याचेही समोर आले आहे. पुण्यासह देशातील शहरांमध्ये हवा प्रदूषण वाढले आहे. राज्यात मुंबईत धुळीच प्रमाण चांगलेच वाढले होते. त्यानंतर पुण्याची परिस्थिती समोर आली होती. त्यामुळे शहरांमध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांने राज्यातील सर्व शहरांसाठी निर्देश पारित केले आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकामध्ये विविध बांधकामांना त्यांच्या साईटवरून उत्सर्जित होणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.
हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेची कार्यवाही...
- सर्व बांधकाम विकसकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियमांची माहिती देण्यात आली आहे.
- बांधकाम विभागाच्या सेवकांद्वारे विविध बांधकामांच्या साईटवर पाहणी करण्याचे काम सुरु करण्यात आली
- आतापर्यंत ६ बांधकाम व्यवसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
- घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मुख्य रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफ-सफाई करणेसाठी मॅकॅनिकल स्ट्रीट स्वीपर मशीनचा वापर वाढवणे व पाण्याचे स्प्रिंकल सिस्टम वापरणे बद्दल दिले आदेश
- ज्या ठिकाणी बांधकाम साहित्य लोडिंग व अनलोडिंग होते अशा ठिकाणी पाण्याचे स्प्रिंकल सिस्टम बसविण्यात आले आहे.
- बांधकामाच्या चहुबाजूंनी बॅरेकेटींग / ग्रीन नेट बसविण्यात आले आहे.
- पथ विभागामार्फत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे.
- विद्युत विभागामार्फत विविध स्मशानभूमी येथे एअर पोल्युशन कंट्रोल यंत्रणा बसविण्यात आली आहे.
- इलेक्ट्रिक आणि गॅस दाहिन्या बसविण्यात आल्या आहेत.
नोटीस बजाविण्याची कारणे...
- प्रामुख्याने बांधकामाच्या साईटवर सर्व बाजूनी पत्रे लावणे, जागेवर राडा रोडा / धूळ बाहेर जाऊ नये यासाठी पाण्याचे स्प्रिंकल सिस्टम यंत्रणा बसविणे, जागेवर ग्रीन नेट बसविणे इत्यादी प्रकारचे उपाययोजना न-केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी बांधकामांच्या साईटवर पुणे महानगरपालिके तर्फे पाहणी करण्यात येणार आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनां बद्दल आढावा घेण्यात येऊन सबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हवा प्रदूषण नियंत्रण पथके...
- सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हवा प्रदूषण नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे.
- पथकामध्ये उप अभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता / बीट निरीक्षक, एम.एस.एफ जवान यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- पथकाने मागर्दर्शक तत्वानुसार कामकाज करावयाचे आहे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावयाचा आहे.
- पथकामार्फेत उघड्यावर कचरा जाळणे तसेच राडा-रोडा टाकणे यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- पुणे महामेट्रोच्या बांधकामाच्या साईटवर उत्सर्जित होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी महामेट्रो मार्फत विशेष पथक नेमण्यात आले आहे.