सावकारी कर्जाने घेतला तरुणाचा बळी

कामासाठी घेतलेल्या सावकारी कर्जाने व्यावसायिक तरुणाचा बळी घेतला. अवघ्या ४० हजार रुपयांच्या कर्जासाठी सावकाराने लावलेल्या तागाद्याला आणि त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वडगाव शेरी येथील गार्डेनिया सोसायटीमध्ये घडली.

सावकारी कर्जाने व्यावसायिक तरुणाचा घेतला बळी

चाळीस हजारांच्या कर्जासाठीच्या तगाद्याला आणि मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

कामासाठी घेतलेल्या सावकारी कर्जाने व्यावसायिक तरुणाचा बळी घेतला. अवघ्या ४० हजार रुपयांच्या कर्जासाठी सावकाराने लावलेल्या तागाद्याला आणि त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वडगाव शेरी येथील गार्डेनिया सोसायटीमध्ये घडली. चंदननगर पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली असून त्यानुसार तपास करून संबंधित सावकाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत दत्तात्रय कातोरे (वय ४१, रा. गार्डेनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विनय विष्णुपंत काळे (वय ३८, रा. नवरत्न सोसायटी,  वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दत्तात्रय साहेबराव कातोरे (वय ६९) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे हा सावकार असून तो पैसे व्याजाने देण्याची कामे करतो. शशिकांत यांचा 'सद्गुरू इन्फ्रा' या नावाने व्यवसाय होता. बांधकाम कन्स्ट्रक्शन साईटवरील फुटिंगची आणि खोदाईची कामे ते करीत होते. त्यांच्या मालकीचा जेसीबीदेखील आहे. त्यांना कन्स्ट्रक्शन व्यवसायासाठी बँकेचे कर्ज आवश्यक होते. त्याकरिता ते बँकेच्या शोधात होते.

याच काळात काळे आणि शशिकांतची ओळख झाली. त्याने 'तुम्ही बँक लोनच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही मला त्यावर पाच टक्क्यांच्या हिशोबाने परतावा द्या' असे सांगितले. शशिकांत याने काळे यांच्याकडून ४० हजार कर्ज घेतले होते. त्याला ठरल्याप्रमाणे पाच टक्केप्रमाणे वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात पैसे दिले. मागील काही महिन्यांपूर्वी शशिकांत यांनी नवीन साईट चालू करण्यासाठी आरोपीकडून परताव्याच्या पाच टक्के दराने पुन्हा पैसे घेतले. परंतु, ही साईट चालू झाली नाही. त्यानंतर काळे याने या रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यास सुरुवात केली. या सर्व पैशांची मागणी सुरू केली. शशिकांतच्या घरी जाऊन त्यांना 'आम्हाला पैसे दिले नाही तर, तुम्हाला तुरुंगात पाठवतो' अशी धमकी दिली.


तसेच त्याने फिर्यादी दत्तात्रय कातोरे यांनाही फोन करून 'तू माझ्या पैशांचे काय करणार आहेस? तुला माहीत आहे ना मी कसा आहे? तू जर पैसे दिले नाही, तर समजून घे' अशी धमकी दिली. यासोबतच शशिकांत यांच्याकडे व्याजाचा तगादा लावला. त्यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. ही नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश घोरपडे करीत आहेत

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest