Stones fly : इथे दगडही उडतात !

स्त्याच्या खोदकामातून निघालेले दगड, तसेच वाहनांना उटी लावण्यासाठी आणलेले दगड शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर पडलेले पाहावयास मिळतात. हे दगड वेगवान आणि अवजड वाहनांच्या चाकाखाली येऊन प्रचंड वेगाने उडत आहेत. या उडालेल्या दगडाने गंभीर जखमी होऊन एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच पाच किलो वजनाचा दगड उडून एका कारची काच तोडून आत पडला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Mon, 29 May 2023
  • 05:45 pm
Stones fly : इथे दगडही उडतात !

इथे दगडही उडतात

शहरात रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड अवजड वाहनांच्या चाकाखाली येऊन हवेत उडत असल्याने दुचाकीस्वारांचा, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात; चारचाकी, दुचाकींचेही नुकसान

महेंद्र कोल्हे / नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

feedback@civicmirror.in

TWEET @mahendrakolhe30


स्त्याच्या खोदकामातून निघालेले दगड
, तसेच वाहनांना उटी लावण्यासाठी आणलेले दगड शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर पडलेले पाहावयास मिळतात. हे दगड वेगवान आणि अवजड वाहनांच्या चाकाखाली येऊन प्रचंड वेगाने उडत आहेत. या उडालेल्या दगडाने गंभीर जखमी होऊन एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच पाच किलो वजनाचा दगड उडून एका कारची काच तोडून आत पडला होता.

शहरातील सारसबाग चौक, सिंहगड रस्त्यावरील सानेगुरुजी स्मारकाजवळ, पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप स्मारकाजवळ विविध कारणांसाठी केलेल्या खोदकामांमुळे रस्त्यावर दगड पडलेले दिसून येत आहेत.

शहरातील अनेक भागातील रस्त्यावर जलवाहिनेचे काम करताना, इतर खासगी कंपनीच्या केबल टाकण्यासाठी, पावसाळी पूर्व कामे करण्यासाठी रस्ता खोदला जात आहे. त्यावेळी त्यातून आलेले दगड, रस्त्याच्या डांबराचे कडक तुकडे हे शहरातील जवळपास सर्वच भागात पडलेले आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी जड वाहनांचा रस्त्यावरच बिघाड झाल्यामुळे चालक त्यांना रस्त्यावर उभे करतात. त्यावेळी ही उभी असलेली वाहने मागे- पुढे जाऊ नये, यासाठी या वाहनांच्या चाकांना मोठ्या दगडाची उटी लावली जाते.

चालक रस्त्याच्या कडेला अवजड वाहन उभे करून त्यांची दुरुस्ती करतात. दुरुस्ती झाल्यावर मात्र दगडाची लावलेली उटी पायाने बाजूला सरकवून तेथून वाहन घेऊन जातात. अशा वेळी उटी लावण्यासाठी त्यांनी लांबून शोधून आणलेले दगड असेच रस्त्याच्या कडेला पडलेले असतात. त्यांचा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा तर होतोच परंतु ते जड वाहनांच्या टायरमुळे उडून अपघातही होत आहेत. अशा रस्त्यावरील दगडांना हटवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.

जागेतून निघालेले दगड, तसेच डांबरी तुकडे आणि अन्य कारणांसाठी आणलेले दगड हे रस्त्यावर आणि त्याच्या कडेला पडलेले असतात. त्यातले काही दगड हे पायी चालणाऱ्या नागरिकांच्या पायाने रस्त्यावर येत असतात. तेथून अवजड वाहने जात असताना त्यांच्या चाकाखाली हे दगड येऊन बंदुकीतील गोळीच्या वेगाने उडतात. मागील चार दिवसांपूर्वीच पुणे-सातारा रस्त्यावर असाच एक दगड उडून अपघात झाला होता. चार ते पाच किलो वजनाचा तो दगड उडून जवळच उभ्या असलेल्या कारची काच फोडून आ पडला होता. यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. कार चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. रांका ज्वेलर्स येथील चौकातील सिग्नलवर नेक्सॉन कार उभी होती. यावेळी बीआरटी मार्गातून पीएमपीएमएल बस जात होती. यावेळी बसच्या चाकाखाली मोठा दगड आला. चार ते पाच किलो वजनाचा तो दगड प्रचंड वेगाने उडला आणि जवळच उभ्या असलेल्या कारची काच फोडून आत पडला होता. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवघेणा अपघात टळला.

अशा उडणाऱ्या दगडांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. शहरात रस्त्यावर सतत रहदारी असते. त्यामुळे पायी चालणाऱ्या लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांना, तसेच सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी असे उडणारे दगड धोकादायक आहेत. रस्त्याला लागूनच दुकाने आहेत. त्यांनाही अशा दगडांचा धोका आहे. शहरात असे अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये ज्या वाहनाच्या चाकाखालून हे दगड उडाले आहेत. त्याच्या चालकांची फारशी चूक नसते. रस्त्यावर दगड टाकणाऱ्यांना प्रशासनाने जबाबदार धरले पाहिजे. त्यांनी काम झाल्यावर रस्त्यावर पडलेले दगड तसेच सोडलेले असतात. महापालिका प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करायला हव्या, असे किरण नायडू यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.

सर्व वयोगटातील नागरिक पदपथावरून चालत असतात. त्यात विद्यार्थी, मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना असा एखादा दगड उडून लागला तर एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. खोदकाम झाल्यावर त्यातून निघालेल्या दगडांची पालिकेने योग्य विल्हेवाट लावली पाहिजे, असे पंकज केजगुने म्हणाले. रस्त्यावर पडलेले दगड हे तसेच का ठेवण्यात येतात? ते उचलले जात का नाही? याबाबत प्रशासनाची काय बाजू आहे, हे जाणून घेण्यासाठी पालिकेच्या पथ विभागातील मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest