संग्रहित छायाचित्र
पुणे शहरातील रुग्णालये आणि इतर परिसरात १२१ सायलेन्स झोन ठरविण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी कर्कश हॉर्न वाजविण्यापासून ते मोठ्या आवाजात कार्यक्रमांचे आयाेजन करण्यापर्यंत अनेक गोष्टी होत असताना त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. सायलेन्स झोनच्या नियमांचा भंग झाल्यास कारवाई करायची कोणी हा प्रश्न आहे. पोलिसांकडे तक्रार झाल्यास तेवढ्यापुरते येतात, पण कारवाई होत नाही. पुण्यातील रुफटॉप हॉटेलांवरील कारवाईप्रमाणेच सायलेन्स झोनवरील कारवाईबाबतही यंत्रणांमध्ये संभ्रम आहे. (Pune Silence Zone News)
होळीच्या (Pune Holi Festival) निमित्ताने सायलेन्स झोनचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. काही ठिकाणी तर आत्तापासूनच मोठ्या कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. स्पीकरच्या भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. खुलेआमपणे सुरू असलेल्या या तयारीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष हाेत आहे. शासनाकडून न्यायालये , महत्त्वाची रुग्णालये, विविध शासकीय विद्यालये तसेच महत्त्वाची ठिकाणे सायलेन्स झोन म्हणून घोषित केली जातात. शासनाने पुण्यातील १२१ ठिकाणे सायलेन्स झोन म्हणून घोषित केली आहेत. या झोनमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असतानाही पुण्यात मात्र नियम धाब्यावर बसवून शांतता भंग करणाऱ्या कार्यक्रमांचे आयाेजन होत आहे.
मोटार वाहन कायद्यातील २३(१)१७७ अन्वये काही ठिकाणी कारवाई केली जाते. मात्र, कार्यक्रमांवरील कारवाईबाबत डोळेझाक केली जात आहे. रुग्णालयांचा परिसर हा सायलेन्स झोनच आहे. ४०-५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज केल्यास दंड आकारला जातो किंवा केला पाहिजे. मात्र, रुग्णालयांच्या आवारात बेकायदेशीर कृत्ये होतच राहतात. याचा रुग्णांना प्रचंड त्रास होतो. त्रास खूपच वाढला तर आम्ही ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधतो. ते प्रतिसाद देतातही. मात्र, अशा घटना वर्षानुवर्षे होत असतानाही ध्वनिप्रदूषणामुळे रुग्णालय आणि रुग्णांना त्रास झाल्याबद्दल एकाही व्यक्ती किंवा संस्थेला दंड करण्यात आलेला नाही, असे पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन भगली यांनी सांगितले.
होळीसाठी तयारी
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून होळीच्या पार्ट्या आयोजित करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साहजिकच ध्वनिप्रदूषण वाढते. मात्र, त्याकडे हवे तेवढे लक्ष दिले जात नाही.
पुणे महापालिकेच्या हद्दीत सायलेन्स झोन तयार करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने हे तयार केले आहेत. सुमारे १२१ सायलेन्स झोन ठरविले आहेत. - मंगेश दिघे, पर्यावरण विभाग प्रमुख, पुणे महापालिका
सायलेन्स झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, १९९९ नुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.एनजीटीमध्ये त्यांच्या विरोधात खटला दाखल होऊ शकतो . तसेच पहिल्या वेळेस उल्लंघन करणाऱ्यांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दुसऱ्यांदा त्याच गुन्ह्यासाठी दंड वाढविला जाऊ शकतो. -ॲड . रघुनाथ महाबळ (वकील )
शांतता झोन म्हणजे काय ?
रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयापासून शंभर मीटर अंतरापर्यंत असणारे क्षेत्र हे सायलेन्स झोन म्हणून घोषित केले जाते. ज्यामध्ये रुग्णांना, विद्यार्थ्यांना, न्यायालयीन प्रक्रियेला बाहेरच्या आवाजाचा त्रास होऊन कामकाजात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.
शांतता झोनमध्ये हे टाळा!
कोणतेही संगीत वाजवू नका
वाद्य वाजवण्यास बंदी
कोणत्याही साधनांचा आवाज नको
गर्दी जमविण्यासाठी नक्कल, संगीत, सादरीकरण नको