पुण्यात सात नवीन पोलीस ठाणी!

शहराच्या दिवसागणिक विस्तारत चाललेल्या कक्षा, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढणारी गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीचे प्रश्न यावर उपाययोजना करण्यासाठी गृह विभागाने पुणे शहरातील सात नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे.

Pune Police

पुण्यात सात नवीन पोलीस ठाणी!

शासन दरबारातील अनास्था अखेर दूर, ६० कोटींच्या खर्चाला मंजुरी, ८१६ पोलीस कर्मचारी मिळणार, ‘सीविक मिरर’ने प्रस्ताव रखडल्याचे आणले होते उघडकीस

शहराच्या दिवसागणिक विस्तारत चाललेल्या कक्षा, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढणारी गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीचे प्रश्न यावर उपाययोजना करण्यासाठी गृह विभागाने पुणे शहरातील सात नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे.

या पोलीस ठाण्यांकरिता ६० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या पोलीस ठाण्यांसाठी ८१६ पोलीस कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी या नव्या सात पोलीस ठाण्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार असून त्यांच्या जागांची निश्चिती झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी (दि. ३० सप्टेंबर) दिली.

पुणे शहराची हद्द मोठ्या प्रमाणावर वाढली असून ग्रामीण भागातील अनेक गावे शहराच्या हद्दीत समाविष्ट झाली आहेत. शहराच्या सीमा दिवसागणिक फुगत चालल्या आहेत. या भागात कॉस्मोपोलिटन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकरदार, व्यावसायिक आणि कामगारांच्या नव्या वसाहती निर्माण होत आहेत. त्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याचे चित्र आहे.

पुणे पोलिसांनी वाढत्या क्षेत्राचा अभ्यास करून नवीन पोलीस ठाण्यांची आवश्यकता शासन दरबारी नमूद केली होती. यासोबतच, कोणत्या भागात नवीन पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे आणि कोणत्या भागात ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस ठाणी वर्ग करून घेता येतील त्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. शहर पोलिसांच्या या प्रस्तावाला डिसेंबर २०२० मध्ये मंजुरी देण्यात आली होती. तसेच, जानेवारी २०२१ मध्ये ही पोलीस ठाणी सुरू करावी, असे नियोजनदेखील करण्यात आले होते. मात्र, तीन वर्षे उलटून गेल्यानंतरदेखील ही पोलीस ठाणी अस्तित्वात आलेली नव्हती. मंत्रालयात हा प्रस्ताव अखेरच्या मान्यतेसाठी पडून असल्याची माहिती ‘सीविक मिरर’ने उजेडात आणली होती.

पुणे शहराची हद्द पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आजमितीस ३२ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील लोणी काळभोर, लोणीकंद, हवेली आदी पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून या हद्दी आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहर पोलीस दलाची हद्ददेखील वाढली. आहे त्याच मनुष्यबळात कामकाज करावे लागत होते.

ग्रामीण पोलीस आणि शहर पोलीस दलाच्या प्रत्येकी तीन अशा सहा पोलीस ठाण्यांचे विभाजन करण्यात येणार होते. लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करून वाघोली पोलीस ठाणे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून उरुळी कांचन पोलीस ठाणे, हवेली पोलीस ठाण्याचे विभाजन करून नांदेड सिटी पोलीस ठाणे, चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याचे विभाजन करून बाणेर पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून काळेपडळ पोलीस ठाणे आणि चंदननगर पोलीस ठाण्याचे विभाजन करून खराडी पोलीस ठाणे निर्माण करण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र, हा विषय पुढे सरकू शकलेला नव्हता. त्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

पोलिसिंग’ला येत होत्या मर्यादा

शहरात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या होत आहेत. वाटमारीचे गुन्हेदेखील वाढले आहेत. सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडत आहेत. तसेच, मोबाईल हिसकावणे हे तर नित्याचेच बनले आहे. शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीवरील भागात आणि उपनगरांमध्ये या घटना वाढतल्या आहेत. वाहनचालकांना लुटणे, वाहनांची तोडफोड करणे, भुरट्या चोऱ्या या घटनांमुळे पोलीस हैराण झाले आहेत. त्यातच मोर्चे, आंदोलने, राजकीय सभा, नेत्यांचे दौरे यामुळे या त्रासात आणखी भर पडत आहे. गुन्हेगारीचे नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था राखणे, सामाजिक सलोखा राखणे याकडेही लक्ष द्यावे लागते. पोलीस ठाण्यांची हद्द मोठी झाल्याने गस्त घालण्यात आणि सर्वत्र लक्ष ठेवण्यात पोलिसांना मर्यादा येत आहेत. हद्दीचा आवाका आणि पोलिसांची उपलब्धता याचा मेळ बसत नसल्याने प्रभावी 'पोलिसिंग' होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम पोलिसांच्या 'रिस्पॉन्स टाईम'वर देखील होत आहे. शहराची वाढती हद्द, लोकसंख्या, वाढते गुन्हे यांचा पुढील काही वर्षांचा विचार करून नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला होता. त्याविषयी अखेर निर्णय झाला असून ही पोलीस ठाणी प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे कामकाजाची विभागणी होईल. तसेच, कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. दसऱ्यापूर्वीच नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू होईल. गेले तीन ते चार वर्षे नव्या पोलीस ठाण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या आवारात नवी इमारत बांधण्यात येणार असून, त्याकरिता २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरात नवीन दोन हजार ८८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी ४३३ कोटी रुपयांच्या निधीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

ही आहेत नवीन पोलीस ठाणी पोलीस ठाणे उपलब्ध निधी

खराडी..........................७ कोटी ५० लाख

फुरसुंगी..........................८ कोटी ८१ लाख

नांदेड सिटी ...................८ कोटी ६० लाख

वाघोली ठाणे....................८ कोटी ७५ लाख

बाणेर..............................८ कोटी ६० लाख

आंबेगाव..........................७ कोटी ९ लाख

काळेपडळ....................१० कोटी २४ लाख

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest