संग्रहित छायाचित्र
राज्यातील नागरिकांकडून हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळवणारा नोंदणी आणि मुद्रांक विभाग तंत्रज्ञानाबाबत दरिद्री असल्याचे गुरूवारी (दि. २१) पुन्हा एकदा समोर आले आहे. या विभागाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील क्लाऊडमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने गुरुवारी सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यप्रणालीमधील दस्त नोंदणीचे काम ठप्प पडले होते. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले आहे. (Registration and Stamp Department)
राज्याला महसूल मिळवून देण्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. नोंदणी विभागाला दरवर्षी चाळीस हजार कोटींहून अधिक महसूल मिळत आहे. एवढा महसूल देऊनही दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुय्यम निबंध कार्यालयात सुविधा मिळत नाहीत. कार्यालयात बसण्याची अपुरी व्यवस्था आहे. कार्यालयातील जागा नागरिकांना अपुरी पडते. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. कार्यालयात बसण्यास तसेच उभे राहण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांना कार्यालयाबाहेर उन्हात उभे राहावे लागत आहे. एवढा प्रचंड महसूल मिळूनही दुय्यम निबंधक कार्यालयासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी देण्यास शासन हात आखडता का घेत आहे, असा प्रश्न विचारला जात आाहे. अशा प्रकारच्या गैरसोयीमुळे नागरिक नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
येत्या १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मार्चअखेरीस खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यावर नागरिकांचा विशेष भर आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. राज्यात ५०० पेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या ठिकाणी दस्त नोंदणीसाठी नागरिकांची कायम गर्दी असते. राज्यभरात दररोज सरासरी आठ ते दहा हजार दस्तांची नोंदणी होते. परंतु नोंदणी विभागाच्या प्रणालीतील समस्यांमुळे गुरुवारी राज्यातील दस्त नोंदणी ठप्प पडली होती. दुपारी तीन नंतर ही समस्या दूर करण्यात नोंदणी विभागाला यश आले. त्यानंतर नोंदणी सुरळीत चालू झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नागरिक तासनतास ताटकळत उभे
दस्त नोंदणी कार्यालयात अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा तांत्रिक समस्येमुळे दस्त नोंदणी होऊ शकत नाही. तसेच काही वेळा सर्व्हर संथ गतीने सुरू असतो. त्यामुळे दस्त नोंदणीच्या वीस मिनिटांच्या कामासाठी तीन ते चार तास लागतात, अशी तक्रार अनेक नागरिकांनी ‘सीविक मिरर’कडे केली. या प्रकारामुळे दस्त नोंदणीसाठी बाहेरगावावरून अथवा इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक, रजा काढून येणारा नोकरदार वर्ग यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
महसूल भरूनही मनस्ताप
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीनंतर मुद्रांक शुल्क व दस्त हाताळणी शुल्क आकारले जाते नागरिकांकडून शुल्क आकारूनही सुविधा मात्र मिळत नसल्याचे समोर आले आहे. सध्याच्या वेळेला अधिक महत्त्व आहे. मालमत्ता खरीदार विक्री करणारी व्यक्ती त्यांच्यासोबत साक्षीदार असे सर्वजण दस्त नोंदणी वेळी हजर असतात. या सर्वांना सर्व्हर डाऊन होणे अथवा संथ होणे याचा त्रास सहन करावा लागत आहे. दस्त नोंदणीसाठी हजारो रुपयांचे मुद्रांक शुल्क भरूनही नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
क्लाऊडवरील स्पेस वाढत नाही का?
नोंदणी विभागाकडून मध्यंतरी सर्व्हरचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी नोंदणी विभागाचा सर्व्हरवरील डेटा क्लाऊडमध्ये स्थलांतरित करण्यात आला. हे काम राज्यस्तरावरील एका कंपनीला देण्यात आले. क्लाऊडवर डेटा स्थलांतरित झाल्यानंतर सर्व्हर डाऊन अथवा संथ होणे ही समस्या राहणार नाही, असा दावा शासनाकडून करण्यात येत होता.मात्र ही समस्या पुन्हा पुन्हा निर्माण होत असल्याने शासनाचा हा दावा खोटा ठरला आहे.यावेळी त्रस्त नागरिकांकडून क्लाऊडवर अधिक स्पेस निर्माण करून दस्त मिळण्याच्या प्रणालीचा वेग कायम ठेवण्याची मागणी होत आहे
संबंधित कंपनीसोबत शासनाने जो करार केला होता, त्यानुसार त्या कंपनीला क्लाऊडवरील स्पेस वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी विभागाकडून लवकरात लवकर व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
- नंदकुमार काटकर, सह महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग