रणसंग्राम २०२४: जोशी, शिंदे, धंगेकरांवर आबा बागुलांचा लेटरबॉम्ब!

पुणे: आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदे यांच्यासह अनेकजण पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. उमेदवारीबाबत एवढे दिवस गप्प असलेले ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी

Pune Congress

संग्रहित छायाचित्र

जाहीर सभेत पुणेकरांचा कौल घेऊन काँग्रेस उमेदवार ठरविण्याचे पत्राद्वारे केले आवाहन

पुणे: आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्यासह अनेकजण पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. उमेदवारीबाबत एवढे दिवस गप्प असलेले ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल (Aba Bagul) यांनी पत्र लिहून पुणेकरांचा कौल घेऊनच काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी द्यावी, असे आवाहन एका पत्राद्वारे पक्षश्रेष्ठींना केले आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. 

पुणे शहर काँग्रेसमध्ये (Pune Congress) गटबाजी असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. लोकसभेच्या निमित्ताने ही गटबाजी प्रत्यक्षात दिसू लागली आहे. उमेदवारीवरून खासगीत नेते एकमेंकांची उणीदुणी काढत होते. आता बागुल यांनी जाहीर पत्र लिहून आपली इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात बागुल म्हणतात की, पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यासाठी जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या. हा कौल पाहून मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवाराचा निर्णय घ्यावा. लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहज शक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो. या सभेला हजारोच्या संख्येने पुणेकर नागरिक उपस्थित राहतील. पुणेकर मतदार सूज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊन लोकसभेसाठी उमेदवार ठरवा, असे बागूल यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पत्रात बागूल यांनी  आपण केलेल्या कामाचा संदर्भ दिल्यामुळे त्यांनीही उमेदवारीचा दावा केल्याचे मानले जात आहे.  (Lok Sabha 2024)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest