संग्रहित छायाचित्र
पुणे: गणेशोत्सवात नागरिकांची सुरक्षा लक्षात घेत पुणे महापालिकेने वेगाने पावले उचलत शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांपैकी ३० टक्के दुरूस्त केले आहेत.
पुणे महापालिकेने शहरातील मुख्य भागात लावलेल्या २ हजार ९०९ सीसीटीव्ही कॅमेर्यांपैकी १ हजार ५४ कॅमरे बंद पडल्याची माहिती समोर आली होती. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने सुरक्षितता धोक्यात आल्याने काळजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने वेगाने पावले उचलत शहरातील ३० टक्के सीसीटीव्ही कॅमेर्यांची दुरूस्ती पूर्ण केली. उर्वरित कॅमेर्यांची दुरूस्ती पुढील दोन दिवसात होणार आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले.
शहरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बंद पडलेल्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती महापालिकेने करावयाची की पोलिसांनी करावी, यावरुन शीतयुध्द सुरु झाले होते. यावर प्रसार माध्यमांतून यावर टीकेची झोड उटल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिकाच कॅमरे दुरुस्त करणार असल्याचे जाहीर केले होते.
विद्युत विभागाच्या मागणीनुसार कॅमेर्यांच्या दुरूस्तीसाठी ५० लाख रूपये वर्गीकरणाने निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर तत्काळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात मोबाइल चोरी, साखळी ओढणे, आणि खिसेकापू यांसारखे गुन्हे वाढतात. अशा परिस्थितीत या सीसीटीव्ही कॅमेर्यांची दुरुस्ती आवश्यक होती.
महापालिका प्रशासनाचा दावा होता की त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत आणि त्यांचे नियंत्रण पोलिसांकडे आहे. त्यामुळे पोलिसांनीच दुरुस्ती करायला हवी. मनपाच्या विद्युत विभागाने शहरात २ हजार ९०९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यापैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते, तर १ हजार ०५४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. शहरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झालेली आहे, अशा स्थितीत एक हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे शहराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. अखेर महापालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून महापालिकेच्याच वतीने कॅमेर्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू केले.