पुणे: महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरी पाठवा; धीरज घाटे यांची मागणी
पुणे महापालिकेत (PMC) शासनाच्या सेवेतील अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून आले आहेत. ते प्रत्यक्ष ग्राऊंड उतरून काम करत नाही. पुणे शहराची त्यांनी भौगोलिक जाण नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी कामात कुचराई केल्याप्रकरणी त्यांनी घरी पाठवावे, अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी मंगळवारी (दि. ११) केली.
पुण्यामध्ये पहिल्या पावसात संपूर्ण पुणे शहरात पाणीच पाणी झाल्याचे चित्र दिसून आले. नालेसफाई आपत्ती व्यवस्थापन आदी विभागात झालेली दिरंगाई यावरून क्षेत्रीय कार्यालयात पुरेशी साधन सामग्रीची कमतरता यामुळे पुणेकर पहिल्याच पावसात त्रस्त झाले होते. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे, प्रसन्न जगताप, अजय खेडेकर, राजेश येनपुरे, सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर , राहुल भंडारे, राघवेंद्र मानकर, वर्षा तापकीर, सुभाष जंगले, राजेंद्र काकडे, अर्जुन जगताप, सचिन बालवडकर, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
आयुक्तांना निवेदन दिल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना घाटे म्हणाले, ‘‘मागील आठवड्यात पुण्यामध्ये जे घडले ते गंभीर आहे. यासंदर्भात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांना निवेदन दिले आहे. शनिवारी (दि. ८) अनेक भागात रस्त्यांवर गुडघाभर पाणी होते. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी फिल्डवर दिसत नाहीत. लोकप्रतिनिधी कार्यकर्ते घटनास्थळी असतात. अधिकारी असले तरी त्यांच्याकडे यंत्रसामग्री नसते, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याचा पालिकेने विचार करावा. शासनाचे अधिकारी आहेत. त्यांना शहराची माहिती नसते. याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी अशा निष्क्रिय अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून त्यांना घरी पाठवावे.’’
लवकरच संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात येत आहेत. यासाठी महापालिकेची यंत्रणा लावण्यास सुरुवात करावी. शाळांमध्ये सर्व तयारी करावी. आपत्ती व्यवस्थापन विभागात उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक रात्रपाळीसाठी करावी, अशीही मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने यावेळी आयुक्तांना केली.