राजकीय धुमश्चक्रीत पुणेकरांचा ‘कोंड’मारा

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभाही घेतल्या. वाहतूक पोलिसांनी या सभांच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करीत अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवली होती.

संग्रहित छायाचित्र

‘मविआ’ आणि महायुतीच्या सभांमुळे लष्कर-स्टेशन परिसर ‘जाम’, भर उन्हात मनस्तापाचा वळसा

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभाही घेतल्या. वाहतूक पोलिसांनी या सभांच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करीत अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि सभास्थानांकडे जाणारे रस्ते बंद ठेवले होते. या राजकीय धुमश्चक्रीत पुणेकरांचा मात्र, भर उन्हात चांगलाच घाम निघाला. या सभांना आलेले कार्यकर्ते, त्यांची रस्त्यांवर बेशिस्तपणे लागलेली वाहने, बंद असलेले रस्ते यामुळे लष्कर, पुणे स्टेशन, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड कोंडी झाली होती. वाहनचालकांना अनेक ठिकाणी तीन ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागले.

बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. तसेच, क्वॉर्टर गेट परिसरात महाविकास आघाडीची आणि हॉटेल ब्ल्यू नाईलजवळ महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यानुसार, दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दोन्हीही बाजूने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्याकरिता मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, सभेला जिल्ह्यातून तसेच शहराच्या विविध भागांमधून गाड्यांमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जागा मिळेल तिथे वाहने लावली. त्यामुळेही वाहतूक कोंडीमध्ये भर पडली. सभास्थानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रक काढत क्वॉर्टर गेट परिसर, विभागीय आयुक्त कार्यालय, रास्ता पेठ, साधू वासवानी चौक आदी भागातील रस्ते बंद करीत येथील वाहतूक अन्य रस्त्यांनी वळवली होती. दरम्यान, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडीहून येणारी वाहतूक रेसकोर्समार्गे वळविण्यात आलेली होती. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक, पॉवर हाऊस चौक, संत कबीर चौक, तसेच पुणे स्टेशन परिसरातील आगरकरनगर, क्वीन्स गार्डन परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. बुधवारी रात्रीपासूनच बॅरिकेटिंगला सुरुवात करण्यात आली होती.

गुरुवारी सकाळी सहा ते दुपारपर्यंत हा बदल केला जाणार होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत रस्त्यात असलेल्या मंडप आणि स्टेजमुळे कोंडी कायम होती. दरम्यान, सकाळपासूनच चौकाचौकात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांचा मोठा फौजफाटा नेमलेला होता. वाहनांची संख्या, त्यातही अवजड वाहने, भल्या मोठ्या पीएमपीएमएल बसेस, अरुंद रस्ते यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

घोरपडे पेठ, नाना पेठ, भवानी पेठेकडून क्वॉर्टर गेट परिसरात येणाऱ्या वाहनचालकांना लष्कर, स्टेशन, मंगळवार पेठ, आरटीओ असा वाळसा घालून यावे लागले. लष्कर परिसराकडून स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांना साधू वासवानी चौकापासूनच कोंडीचा सामना करावा लागला. या भागात येऊ पाहणाऱ्या आणि  बाहेर जाऊ पाहणाऱ्या वाहनचालकांना जवळपास तीन ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागले. अनेक वाहनचालक तर गोल गोल फिरत राहिले. मात्र, त्यांना कोंडीमधून बाहेर पडता आले नाही. सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने अनेक वाहनचालकांनी आपली वाहने गल्ली-बोळात घातली. त्यामुळे छोट्या छोट्या लगतच्या रस्त्यांवर देखील कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रस्त्यावरील सभांमुळे कोंडी

महाविकास आघाडी आणि महायुतीला रस्त्यावर सभा घेणे आवश्यकच होते का? या भागात दोन-तीन मैदाने आहेत. त्या मैदानांवर सभा घेता येऊ शकली असती. महाविकास आघाडीची सभा झाली त्या रस्त्याला लागूनच टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचे मैदान आहे. तसेच, महायुतीची सभा झाली तेथून जवळच बी. जे. मेडिकल कॉलेजचे मैदान आहे. या मैदानावर सभा आयोजित करता येऊ शकल्या असत्या. तसेच, या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करता आली असती. मात्र, राजकीय पक्ष नियोजनात कमी पडले. या भागात रुबी हॉल, जहांगिर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आदी मोठी रुग्णालये आहेत. तसेच ससून रुग्णालयही आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते, त्यामुळे होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीत बदल केला होता. या भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. वाहतुकीचा ताण वाढल्याने पुणे स्टेशन, सोमवार पेठ, लष्कर भाग परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आली होती. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.

– रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest