पुणे: आठवड्यातून किमान एकदा शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला तरच १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल!

पुणे: शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठा केवळ ४० दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पाणी बचतीचे नियोजन करण्याची महापालिका आयुक्तांकडे पुणेकरांची मागणी

अमोल अवचिते
पुणे: शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठा केवळ ४० दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने तसेच मतदानावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी पाणी कपातीचा निर्णय होऊ शकत नाही. सध्य परिस्थिती लक्षात घेता दिवसाआड नाही पण किमान आठवड्यातून एकदा तरी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला तरच १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणसाठ्यातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल असे सांगून पुणेकरांनी काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले आहे. परंतु दुसरीकडे शहरासह उपनगर भाग आणि समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा करताना पालिकेची दमछाक होताना दिसून येत आहे. समाविष्ट गावांमध्ये १२०० हून १४०० टँकरच्या फेऱ्या दररोज होत आहेत. उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरवायचा असेल तर आठवड्यातून एक दिवस तरी पाणीपुरवठा बंद ठेवावाच लागणार लागेल. नाही तर पुणेकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा मे महिन्यापासून पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. (Pune Water Crisis)

शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.०८ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ १०.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा मे अखेर पुरु शकणार आहे. त्यामुळे पाणी कपात ही करावीच लागणार आहे. पुणे लोकसभा  मतदार संघाची मतदार प्रक्रिया पार पडली की दुसऱ्या दिवशी पाणी कपात ही लागू केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

महापालिकेने गेल्या आठवड्यात शहरातील बहुतांश भागातील गुरुवारी पाणीपुरवठा वॉल दुरुस्तीसाठी बंद ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. या दरम्यान महापालिकेकडे १६९ तक्रारी प्राप्त झाल्या होता. एक दिवस जरी पाणीपुरवठा बंद ठेवला तरी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे पाणीपुरवठा विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना चांगलाच त्रास झाला होता. त्यामुळे पुन्हा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ आली तर याविचारानेच त्यांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असा अनुभव एका अधिकाऱ्याने सांगितला.

मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे पुणे शहरासह इतर परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. साधारणपणे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास दर वर्षी फेब्रुवारी मार्च महिण्यान्यामध्ये पाणी कपात अथवा पाणी बचतीचे आवाहन करून नियोजन केले जाते. या वर्षी दर वर्षापेक्षा भीषण परिस्थिती असताना केवळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कुठलेही नियोजन दिसत नाही. यासाठी सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर दबाव असणार, हे देखील आम्हाला ज्ञात आहे. लोकसभेची मतदान प्रक्रिया ही १३ मे रोजी पार पडत आहे. मतदानानंतर मात्र राज्यकर्ते पुणेकरांच्या पाण्याविषयी जो काही निर्णय असेल तो तुम्ही घ्या, असे सांगतील. तो पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती अधिक चिंताजनक होईल. पुणेकरांचा रोष प्रशासक म्हणून आपल्यावर ओढावेल पुणेकर समजदार आहेत तरी पाण्याचे बचत नियोजन आपण याच आठवड्यात लागू केल्यास पुढील पावसापुर्वी काही अंशी पाणीपुरवठा सुरळीत राहू शकतो. असे आवाहन करणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.
- अविनाश खंडारे, सामाजिक कार्यकर्ते

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest