संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी (दि. १८) संध्याकाळी ६ वाजता थंडावल्या. मात्र त्यानंतर छुप्या पद्धतीने स्लिप वाटप आणि बैठका घेत प्रचाराचे शीतयुद्ध जोरात सुरू होते. शेवटच्या दोन दिवसात बाजी पलटवली जाते, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डोळ्यात तेल घालून कडा पहारा दिला जात असल्याचे चित्र दिसून आले. तसेच रात्रीची वेळ साधत नाराजांना, विरोधी गटातील मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा खेळ सुरू होता. त्याचबरोबर कोणत्या उमेदवाराकडून एका मताला किती भाव फुटला याची चर्चा रंगली आहे.
मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २०) पार पडणार आहे. सर्व पक्षांतील उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे बूथनिहाय नियोजन केले जात आहे. पक्षातील पदाधिकारी सोसायट्या, वस्त्यांवर गस्त घालत असल्याचे दिसून आले. प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते. तसेच स्लिपांचे वाटप कार्यकर्त्यांकडून केले जात होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांकडे पैसे वाटपाचेदेखील काम देण्यात आल्याच्या अफवा उठवल्या जात होत्या. निवडणूक आयोगाच्या नियमात अडकू नये, म्हणून पुण्यात छुप्या प्रचाराचा नवा ट्रेंड दिसून आला. पक्षचिन्ह न वापरता पक्षाचे ब्रीदवाक्य वापरून सांकेतिक प्रचार केला जात होता.
नियमानुसार प्रचार करता येत नसला तरी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रचार कसा होईल, याची काळजी घेतली जात होती. मतदानापूर्वी राहिलेले काही तास निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. याच काळात अनेक घडामोडी घडून मतदारांचे मत वळविण्याचा प्रयत्न केला जातो. या काळामध्ये मतदारांना भुलवण्यासाठी पैशांचादेखील वापर केला जातो, असा आरोप सातत्याने विरोधी उमेदवारांकडून केला जातो. त्यामुळे प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात माया लोकांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे बोलले गेले.
दरम्यान चौकाचौकात निवडणुकीमध्ये मताला काय भाव चाललाय, याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. पुण्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला वडगाव शेरी मतदारसंघातदेखील मताच्या फुटलेल्या भावाकडे लक्ष लागून आहे. ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी सोपी नसल्याचे बोलले जात असून पैशांचा पाऊस पाडला जाईल, अशा चर्चा तेल-मीठ लावून रंगविल्या जात आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघ आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमधील मताचा भाव चांगलाच वधारल्याच्या चर्चा चौकांमध्ये चघळल्या जात आहे.