संग्रहित छायाचित्र
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी उपक्रमातील एक म्हणजे वन स्टुडंट वन आयडी कार्ड. सर्व विद्यार्थ्यांचा 'अपार आयडी' तयार करण्याच्या सूचनांवरून सध्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्ये अपार कार्ड बनल्यानंतर रहिवासी पत्त्यात बदल करता येणार नाही आणि पालकांच्या माहितीबद्दल गोपनीयता राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानेच पालकांचा संशय वाढविला आहे.
विद्यार्थ्यांसाठी 'अपार आयडी' तयार करायची असल्याचा संदेश शाळांकडून पालकांच्या मोबाईलमध्ये पडला आहे. त्यानुसार या आयडीमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आपली सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवता येतील, असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा हा आयडी बनवण्याकरिता आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे आधार कार्ड शाळेत सादर करणे अनिवार्य असल्याची सूचना आहे. हा केंद्र शासनाचा प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यापुढे दिलेल्या इशाऱ्याने पालक संभ्रमात पडले आहेत.
नितीन पाटील, पालक प्रतिनिधी म्हणाले, " पालकांना संदेशानुसार अपार आयडी बनल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. विद्यार्थ्याचे नाव, पालकांचे नाव, रहिवासी पत्ता आदीमध्ये कोणताही बदल भविष्यात करता येणार नाही. नाव बदलणार नाही, हे ठिक आहे, पण पत्ताच बदलता येणार नाही, या सूचनेने पालकांची चिंता वाढली आहे. अनेक पालक रोजगार किंवा नोकरीच्या कारणाने वेगळ्या शहरात भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या आधार कार्डवर त्याच घराचा पत्ता असतो. पालकांची बदली झाल्यानंतर किंवा घर बदलल्यानंतर त्यानुसार आधार कार्ड अपडेट करावा लागतो. त्यामुळे पत्ता कायमस्वरूपी कसा राहील, असा सवाल पालकांच्या मनात आहे.
यातील दुसरा इशारा गोपनीयतेशी संबंधित आहे. पालकांची आधार कार्डबद्दलची माहिती गोपनीय राहणार नाही, अशी शक्यता असल्याचे संदेशात म्हटले आहे. यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे. त्यानुसार सोबत पाठवलेल्या फॉर्ममध्ये अपार आयडीचे संमती पत्र दिलेले आहे. त्यातील एक प्रत पालकांनी प्रिंट काढून भरावी व संमतीपत्र भरावे, अशी सूचना करण्यात आली आहे. माहिती गोपनीय राहणार नसल्याचा इशारा दिल्याने पालकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. अनेक पालकांनी याबाबत शाळांकडे विचारणा केली असून शिक्षकांकडे याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार किंवा शालेय शिक्षण विभागाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एक शिक्षणाधिकारी म्हणाले,"अपार आयडी ही सुरुवात आहे. यावर पुढे आक्षेप आल्यास पत्त्याबाबत नव्याने बदल करता येईल. हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्यानुसार विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणाला गेल्यास त्याचा संपूर्ण पूर्व शैक्षणिक इतिहास एका क्लिकवर पाहता येईल. त्यानुसार गाेपनीयतेच्या सूचनेबाबतही काळजी करण्यासारखे काही नाही."