संग्रहित छायाचित्र
ओला (Ola) आणि उबेरला (Uber) पुण्यात टॅक्सीसेवेचा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रद्द केला आहे. त्यामुळे ओला आणि उबेर पुण्यात टॅक्सीसेवा देऊ शकणार नाही. या निर्णयाचा फटका या सेवेवर अवलंबून असलेल्या हजारो पुणेकरांना बसणार आहे. याबाबत दोन्ही कंपन्या अपिलात जाऊ शकणार आहेत. त्यामुळे या बंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट केले नाही. मोटार व्हेईकल अॅग्रिगेटर गाईडलाईन्स, २०२० च्या अधिनियमानुसार चारचाकी हलक्या वाहनांकरिता ॲॅग्रिगेटर लायसन्स मिळण्यासाठी ओला आणि उबेर यांचे अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे प्रलंबित होते. या कंपन्या कायद्यात असणाऱ्या तरतुदींची पूर्ण पूर्तता करीत नाहीत, असे पुनर्विलोकनात आढळून आले. त्यामुळे या दोन्ही अर्जदारांनी चारचाकी हलक्या वाहनांकरिता प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. ही परवानगी प्राधिकरणाच्या सोमवारी (दि. ११) झालेल्या बैठकीत नाकारण्यात आली असल्याचे आरटीओने या संदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
हजारो पुणेकरांची होणार गैरसोय
पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न यामुळे ओला, उबेर वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आरटीओने खरोखरच ओला आणि उबेरची सेवा बंद केल्यास मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आयटीसारख्या क्षेत्रातील कर्मचारी बहुतांश वेळा ओला, उबेरवर अवलंबून असतात. याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिकही या सेवेचा उपयोग करतात. ओला आणि उबेर बंद झाल्यास या घटकांची पंचाईत होणार आहे.
विमानतळाहून येणाऱ्या प्रवाशांनाही बसणार फटका
लोहगाव विमानतळावरून ओला आणि उबेरची सेवा वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विमानतळ प्रशासनाने त्यांच्यासाठी खास पार्किंगची व्यवस्था केली आहे. ही सेवा बंद झाल्यास विमानतळावरून कसे यायचे, असा प्रश्न विवेक काटमारे या नियमित प्रवाशाने उपस्थित केला. काटमारे म्हणाले, ‘‘विमानतळावरून शहरात येण्यासाठी दुसरे कोणतेही चांगले माध्यम उपलब्ध नाही.’’
यापूर्वी १८ कंपन्यांवर कारवाई
बेकायदा प्रवासी वाहतूक, व्यवसाय चालू असणाऱ्या पुण्यातील वेगवेगळ्या १८ कंपन्यांवर पुण्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई करून त्यांचे उपयोजन व संकेतस्थळे बंद करण्याची भूमिका घेण्यात आली होती. ओला आणि उबेर या देशभरात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना या कारवाईमधून वगळण्यात आले होते. या संबंधीचे वृत्त ‘सीविक मिरर’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर ११ मार्च रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली. या अगोदर ओला आणि उबेर या दोन कंपन्यांनी मोटार व्हेईकल ॲग्रिगेट गाईडलाईन्स अधिनियम २०२० या नियमानुसार पुण्यात चारचाकी हलक्या गाड्या चालवण्याचे लायसन्स घेण्यासाठी अर्ज केला होता. परंतु या अधिनियमाची पूर्तता करणारी कागदपत्रे या कंपन्यांनी सादर केली नसल्याच्या कारणाने त्यांचा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नाकारला आहे. “परवाना मिळण्यापूर्वी ड्रायव्हरला प्रशिक्षण, वाहन चालविण्याचा दोन वर्षांचा अनुभव या अटी त्याचबरोबर ड्रायव्हर्ससाठी विमा पॉलिसी, आरोग्य विमा, दर दोन वर्षांनी योग्य इंडक्शन आणि परवाना वाहतुकीचे नूतनीकरण यासारखे नियम आवश्यक आहेत. मात्र, याचे पालन या कंपन्यांकडून होत नव्हते.
ओला आणि उबेर यांना तात्पुरता परवाना देण्यात आला होता. परिवहन नियमांचे पालन त्यांच्याकडून होत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही. त्यामुळे हा परवाना नाकारण्यात आला आहे. पुणे शहरामध्ये सध्या होणारी ओला आणि उबेरची वाहतूक बेकायदेशीर ठरणार आहे.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
आता हे स्पष्ट झाले आहे की केंद्राच्या कॅब ॲग्रिगेटर गाईडलाईन्स २०२० नुसार ओला उबरकडे परवाना नाही. या कंपन्यांना जर जिल्ह्यात काम करायचे असेल तर त्यांना राज्याचा खतुआ समितीच्या नियमांप्रमाणे काम करावे लागणार आहे. खतुआ समिती नियमांप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेले दर कंपन्यांनी कॅब चालकांना द्यावे. जर या कंपन्या कायदे पाळणार नसतील तर कंपन्यांचे कामकाज पूर्ण बंद करावे, अशी आमची मागणी आहे. आता या कंपन्यांना कायद्यात पळवाट राहिलेली नाही.
-डॉ. केशव नाना क्षीरसागर, अध्यक्ष, इंडियन गिग वर्कर्स फ्रंट