संग्रहित छायाचित्र
देशात सीएए (CAA) लागू होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. सोमवारी ( ११ मार्च) केंद्रीय गृह मंत्रालयाने 'सीएए' लागू केला. देशात 'सीएए' लागू झाल्यानंतर पुण्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत , त्यांच्या नागरिकत्वाची सध्याची स्थिती याची चर्चा सुरू झाली. त्यातच गेल्या सात वर्षांत पुणे जिल्ह्यातील २८६ पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिल्याची माहिती मिळाली आहे . याशिवाय, एका बांगलादेशी हिंदू नागरिकालाही भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. (286 pakistani living in pune got indian citizenship)
पुणे जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांत सुमारे पाचशे पाकिस्तानी सिंधी आणि हिंदू नागरिकांनी स्थलांतर केले आहे. यातील ३२४ नागरिकांनी २०१८ पासून भारतीयत्वासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २८६ जणांना नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. तसेच एका बांगलादेशी हिंदू नागरिकालाही भारतीयत्व दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून एकूण २८७ जणांना नागरिकत्वाचा लाभ झाला आहे. १९ नागरिकांचे अर्ज फेटाळले आहेत तर १८ अर्जावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई चालू आहे .
‘सीएए' लागू झाल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्यांना धार्मिक छळापासून वाचण्यासाठी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास त्यांना पात्र ठरविले गेले आहे. या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया जलद करणे, हा या कायद्याचा उद्देश आहे. जुन्या कायद्यानुसार, स्थलांतरित व्यक्तीला नागरिकत्व देण्यासाठी त्याचे भारतातील वास्तव्य ११ वर्षांपेक्षा कमी नसावे अशी अट होती. परंतु नव्या कायद्यानुसार ही मर्यादा आता पाच वर्षांवर आणण्यात आली आहे.
१८ अर्ज प्रलंबित का ?
भारतीय नागरिकत्वासाठी ज्या नागरिकांनी अर्ज केले होते, त्यातील १८ अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहेत . याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील (Pune Collector Office) गृह शाखेला विचारले असता या १८ अर्जांपैकी नऊ अर्ज हे गुप्तचर विभागाचा अहवाल आला नसल्याने प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. यातील सहा अर्ज विदेशी नोंदणी कार्यालयाकडे पाठवले होते. ते त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. तीन अर्ज हे अर्जदारांनी स्वीकृती पत्र न दिल्याने, त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे गृह शाखेकडून सांगण्यात आले .
आजपर्यंत एकूण अर्ज - ३२४
नागरिकत्व मिळाले - २८७
किती अर्ज फेटाळले - १९
प्रलंबित अर्जाची संख्या - १८
नागरिकत्व देण्याची प्रक्रिया खूपच पारदर्शक असते . त्यामुळे सर्व बाबींचा तपास करूनच ही प्रक्रिया पूर्ण होते. आम्ही आजपर्यंत २०१८ पासून २८७ जणांना भारतीय नागरिकत्व दिले आहे. या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा तपशील राज्य शासनाला द्यावा लागतो. आमच्याकडे येणारे प्रत्येक भारतीय नागरिकत्वासंबंधीचे प्रकरण आम्ही लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करतो.
- बाळासाहेब शिरसट (तहसीलदार गृह शाखा ,पुणे जिल्हाधिकारी कार्यालय)