संग्रहित छायाचित्र
पुणे महापालिकेतील शहरी भागासह नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अनेक नागरी समस्यांनी नागरिक त्रासले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यातील चार खासदारांनी थेट महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत समस्या सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून आपल्या वर्चस्वासाठीच पुण्यातील चार खासदारांनी महापालिका प्रशासनावर दबाव टाकला असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेत गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकराज सुरू असल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. याला वैतागून नागरिकांनी आता थेट पुण्याच्या समस्यांचा पाढा नवनिर्वाचित खासदारांपुढे मांडण्यास सुरुवात केली आहे. पुण्याचे खासदार मुरधीधर मोहोळ, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे तसेच राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणेकरांच्या समस्यांची दखल घेत त्या सोडवण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकणे सुरू केले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच शहराच्या विविध प्रश्नांबाबत मगहापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी खडकवासला भागातील नागरिकांच्या समस्यांचा पाढा आयुक्तांपुढे मांडला तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.
त्यापाठोपाठ अमोल कोल्हे यांनी हडपसर भागातील नागरिकांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्तांची मंगळवारी (दि. ९) भेट घेतली. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचेदेखील महापालिकेच्या प्रशासनावर चांगलेच लक्ष असून त्यांनी विविध प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. यामुळे खासदारांची पुणे महापालिकेवर वर्चस्व राखण्याची लढाई रंगल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आगामी काळात विधानसभेसाठी निवडणूक होणार असल्याने अधिकारीदेखील सावध असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण, ड्रेनेजलाईन प्रश्न, होणारा अनियमित पाणीपुरवठा, रस्त्यांची रखडलेली कामे, पायाभूत सुविधा पुरवण्यास महापालिकेला आलेले अपयश, टेकड्या फोडून केलेले अतिक्रमण, झाडांची होणारी कत्तल, नैसर्गिक नाले बुजवून करण्यात आलेली बांधकामे तसेच महापालिकेचे रखडलेले विविध प्रकल्प यासह अनेक प्रश्न घेऊन नागरिक आता थेट खासदारांकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे खासदार मोहोळ, सुळे यांच्यानंतर अमोल कोल्हे यांनी हडपसर भागातील नागरिकांचे प्रश्न घेऊन महापालिका आयुक्तांची भेट घेतली.
अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा : मुरलीधर मोहोळ
शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करा. कोणाचाही फोन आला तर घेऊ नका. शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त झाले पाहिजे, असे आदेश सहकार आणि नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापलिका आयुक्तांना दिले आहेत. मोहोळ यांनी महापालिकेतील विकास प्रकल्प आणि विविध प्रश्नांसदर्भात मोहोळ यांनी नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी .पी. तसेच महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. प्रत्येक दहा फुटांवर गाडी आहे. नागरिकांना चालण्यासाठी फूटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत. महापालिका अधिकार्यांना वारंवार याची माहिती देऊनही कारवाई होत नाही, अशा तक्रारी बैठकीला उपस्थित असणार्या नगरसेवकांकडून करण्यात आल्या. त्यावर महापालिकेने कारवाई करावी, असे निर्देश मोहोळ यांनी दिले आहेत. त्यावर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्याचे नियोजन तसेच आराखडा तयार केला जाणार आहे.
मोहोळ यांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी
‘‘महापालिका क्षेत्रातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत. ही जबाबदारी महापालिकेची आहे. कोणत्याही अनधिकृत व्यवसाय असुद्या शहरातील सर्व रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजे. महापालिका प्रशासनाने यामध्ये टाळाटाळ केलेली अजिबात चालणार नाही. काही वेळा महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईला जाण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी कारवाई होणार आहे, त्याठिकाणी फोन करून सांगण्यात येते. असे कोणी अधिकारी अथवा कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा,’’ असे आदेश मोहोळ यांनी महापालिका अधिकार्यांना दिले आहेत. महापालिका प्रशासन कारवाईला गेल्यावर बहुतेक वेळा, राजकीय हस्तक्षेप होतो. अधिकारी कारवाईला गेल्यावर कोणाचाच फोन घेऊ नका. कारवाई थांबावी यासाठी कोणी फोन करू नका, आमच्या कोणाचा फोन आला तरी घेऊ नका, शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त झाले पाहिजे. यासाठी महापालिका प्रशासनाने काम केले पाहिजे. याचा आढावा पुढच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल,’’ अशी तंबी मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
हडपसरमधील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवा : अमोल कोल्हे
पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील ज्यादा मिळकतकर आकारणीसंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर गुंठेवारी कायद्यांतर्गत अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. तसेच हडपसर मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेजलाईन, अपुऱ्या रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मंगळवारी केली.
महापालिका प्रशासनाने सय्यदनगर येथील अंडरपास तत्काळ पूर्ण करावा. तसेच हडपसर ते काळेपडळ, सय्यदनगर ते रामटेकडी रस्ता करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर हडपसरच्या अनेक भागांत अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. समान पाणीपुरवठा योजनेचे काम अपुरे आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. वेळेत कामे पूर्ण केली जात नाहीत. जनता दरबारमध्ये पाण्याची समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असे कोल्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर महापालिकेने मांजरी व फुरसुंगी गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यरत केली. मात्र, या ठिकाणी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी कोटा वाढविण्यात यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली. यावेळी आयुक्त भोसले यांनी वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदाराकडून काम काढून टाकण्याचे आदेश विभागाला दिले.
भिडेवाडा स्मारकात फातिमा शेख यांचे दालन करण्याची मागणी
स्त्री शिक्षणाची जेथून सुरुवात झाली. त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. भिडेवाडा स्मारकाचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात फातिमा शेख यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे भिडेवाडा स्मारकात फातिमा शेख यांचेही वेगळे दालन करावे, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिकेत समाविष्ट गावांच्या समस्या सोडवा : सुप्रिया सुळे
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक कोंडी या विषयावर सुप्रिया सुळे यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी तेथील नागरिकांनी आयुक्तांसमोर त्यांच्या समस्या मांडल्या.
‘‘महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच नाही. त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. या गावातील समस्यांवर दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहे. कात्रज कोंढवा रस्ताच्या कामात महापालिका, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील करआकारणी पिंपरी-चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी,’’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुख्य खात्याकडेच निधी
शहरातील विविध प्रभागातील पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडून सह यादीतील विषयांची कामे करण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. मात्र नगरसेवक नसल्याचे अशी सहयादी दिली जात नाही. त्यामुळे ड्रेनेजलाईन, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा लाईन यासाठी निधी नसल्याने कामेच होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी निधी नसल्याचे कारण सांगत कामे करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.