पुण्यात घरे महागणार!, घरासाठी मोजावी लागणार जादा रक्कम
यंदा पुण्यात (Pune) घर घेण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी जरा चिंताजनक बातमी आहे. २०२४-२५ या वर्षासाठी रेडी रेकनरचे दर ५ ते आठ टक्क्यांनी वाढवण्याची दाट शक्यता असून यामुळे घराच्या किमतीदेखील वाढणार आहेत. (Pune Home)
राज्यातील कोविड महामारीच्या संकटानंतर शासनाने २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवले होते . याचा परिणामअसा झाला की गेल्या वर्षभरात घरे, जागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे २०२४-२५ या वर्षासाठी रेडीरेकनरचे दर पाच ते आठ टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सरकारला पाठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षकांकडून दरवर्षी १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवे दर जाहीर करण्यात येतात. पुढील आठवड्यात नगररचना विभागातील उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांची तीन दिवसांची बैठक नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने आयोजित केली आहे. या बैठकीत हे दर अंतिम होण्याची शक्यता आहे. सदर प्रस्ताव राज्य सरकारला सादर करून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर १ एप्रिलला अधिकृत घोषणा होऊ शकते, असे जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ११ महिन्यांमध्ये दस्तनोंदणीत वाढ झाली आहे. ११ महिन्यांत राज्याला तब्बल ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्यास जागांना योग्य मोबदला मिळेल, अशी अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाईल, अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयातील सुत्रांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
बैठकीला लोकप्रतिनिधी अनुपस्थित
राज्यात काही वर्षांपूर्वी कोविडचे संकट आले होते. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली होती. यामुळे रेडीरेकनरचे दर वाढविण्यात आले नव्हते. यंदा रेडीरेकनरच्या दरवाढीबाबत जिल्हा प्रशासनाकडून विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे.
या संदर्भात जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी मुद्रांक शुल्क तसेच नगररचना विभागाने लोकप्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली होती. त्यानंतर त्यांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे नोंदणी मुद्रांक तसेच नगररचना विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणुकीचे वर्ष असलेल्या यंदाच्या वर्षात रेडीरेकनरमध्ये वाढ होणार का, याबाबत उत्सुकता लागून आहे.
सरकारचा फायदा, परंतु सामान्यांच्या खिशाला चाप
रेडीरेकनर दरात जेवढ्या टक्क्याने वाढ होईल, तेवढ्याच टक्क्यांनी आपोआप बांधकाम व्यवसायिकांच्या प्रत्येक प्राथमिक परवान्यांचे सरकारी मूल्य वाढत जाते. कारण महापालिकेच्या सर्व परवान्यांचे शुल्क रेडीरेकनर दरावर आधारित असतात . त्याचा परिणाम घरांच्या किमतींवर होणार आहे. रेडीरेकनरच्या वाढीसोबतच घराच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्यामुळे याचा परिणाम घर घेणाऱ्या पुणेकरांपासून ते बिल्डरांपर्यंत सर्वांवरच होणार आहे. मात्र याचा फायदा सरकारी तिजोरीतील महसूलवाढीवर होणार आहे. रेडीरेकनर दरवाढीमुळे बँका पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांना जास्त कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात .
पुण्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय सध्या तेजीमध्ये आहे. परंतु रेडीरेकनर दरात वाढ झाली तर आपोआपच फ्लॅटच्या किमती वाढणार आहेत. सध्या व्यवसाय तेजीत असण्याचे कारण लोकांना बजेटनुसार फ्लॅटच्या किमती असल्यामुळे लोक ते खरेदी करू शकतात. परंतु रेडीरेकनर दर वाढले तर घराच्या किमती वाढणार आहेत आणि परिणामी रियल इस्टेट व्यवसायात मंदी येऊ शकते. त्यामुळे शासनाने याच्यावर विचार करायला हवा.
- कपिल गांधी, बांधकाम व्यावसायिक