PUNE: जिल्हाधिकारी कार्यालयात हमाल घोटाळा!

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector Office Pune) मुंबईपेक्षा दुप्पट हमाली दर दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक काळात ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी हमाल पुरवठा टेंडरमध्ये ८५० रुपये दराने आठ तासासाठी हमालांची नियुक्ती केली होती.

Hamal Scam in Pune Collector office

संग्रहित छायाचित्र

मुंबईच्या तुलनेत दुप्पट दराने हमालीसाठीची निविदा मंजूर केल्याने लाखो रुपयांची उधळपट्टी; २०२३च्या विधानसभा पोटनिवडणुकीवेळची घटना

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector Office Pune) मुंबईपेक्षा दुप्पट हमाली दर दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक काळात ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी हमाल पुरवठा टेंडरमध्ये ८५० रुपये दराने आठ तासासाठी हमालांची नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे मुंबईत केवळ ४६६ रुपये प्रतिआठ तासाने हमालीचे टेंडर काढण्यात आले आहे. पुण्याच्या हमाल पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीला दुप्पट पैसे देऊन सरकारच्या लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे . २०२३ मध्ये राजेश देशमुख जिल्हाधिकारी असताना हा प्रकार घडला होता.  (Pune News)

जिल्ह्यात  २०२३ मध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका , इतर निवडणुकांच्या कामकाजासाठी ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी, प्रशिक्षण वर्ग, मतदान यंत्रे सील करणे, साहित्य वाटप-परत करणे, मतदानानंतर ईव्हीएम सुरक्षा कक्षात ठेवणे, मतमोजणी दिवशी ईव्हीएम सुरक्षा कक्षामधून बाहेर काढणे आणि इतर निवडणूक विषयक जिल्हास्तरीय कामासाठी हमाल पुरवठा करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ई निविदा प्रक्रिया राबवली  होती  यामध्ये दोन निविदाधारकांनी भाग घेतला होता . जिल्हाधिकारी कार्यालयाने मे. एस.एस.एस. फॅसिलिटी सर्व्हिसेस यांना हे हमालीचे काम दिले होते .

जिल्हाधिकारी कार्यालयाने हमालांसाठी आकारलेले  हमालीचे दर हे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आकारलेल्या दरांच्या तुलनेत दुप्पट असल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ तासांसाठी  एका हमालासाठी  ४६६ रुपये हमाली दिली. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ तासांकरिता एका हमालासाठी ८५० रुपये  म्हणजेच जवळ- जवळ दुप्पट पैसे खासगी कंपनीला दिल्याने शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचे समोर आले आहे . तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

उडवाउडवीची उत्तरे

आपण  हमालीचे दर कसे ठरवता, असा प्रश्न  निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी हे काम आमचे नसून पुरवठा  विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले , आम्ही फक्त जिल्हाभरात धान्य  उतरवण्याच्या किंवा आमच्या शाखेच्या अनुषंगाने जी कामे होतात तेवढ्याच कामासाठी लागणाऱ्या हमालाीचे टेंडर काढतो त्यामुळे निवडणूक शाखेकडून तुम्हाला चुकीची माहिती सांगितली जात असावी. निवडणुकीसाठी हमाल पुरवठ्याचे टेंडर हे निवडणूक शाखाच काढते.

आम्ही हमालीची किंमत ठरवत नाही. ते पुरवठा विभागाचं काम आहे .आमच्याकडे ज्या निविदाधारकाची निविदा सर्वात कमी आहे, अशा निविदाधारकाला आम्ही ते काम देतो. कोणी किती किंमत कोट करायची हे आम्ही ठरवत नाही. आमच्याकडे हमालीच्या आठ तासांसाठी किती मोबदला द्यायचा याची अधिकृत अशी कोणतीही रक्कम ठरलेली नसते .
- मीनल कळसकर ( उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा )

मुळातच हमाल पुरवठा करण्याची निविदा काढणे चुकीचं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हमालीच कंत्राटीकरण करण्याचा प्रकार आहे. कायदाही हेच सांगतो, जर तुम्हाला हमालांची गरज असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या माथाडी बोर्डाला कळवायला हवं . माथाडी बोर्ड तुम्हाला हमालांची पूर्तता करेल. त्यासाठी स्वतंत्र निविदा राबवण्याची गरज नाही.
- नितीन पवार 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest