रिंगरोड भूसंपादन प्रकरणी शेतकरी रस्त्यावर
पुणे रिंगरोडसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यावर अन्याय केला जात असून, बाजार मूल्याच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, बागायती व हंगामी बागायत मान्य करा, अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोड शेतकरी हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. हवेली तालुक्यातील कल्याण, रांजे, राठवडे, वरदाडे, वसावे वाडी, सांगरून, मांडवी, तातवडी, बाहुली यासह अन्य गावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पुणे, पिंपरी चिंचवड शहराला वाहतूककोंडीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत. सुमारे सातशे गट नंबरमधील हजारो खातेदार शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत. मात्र, या नोटीसांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. राज्य सरकारकडून २३ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या जीआरनुसार मोबदला देण्याऐवजी कमी मिळत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. जीआरनुसार योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
“आमचा विकासाला विरोध नाही, पण ज्यावेळी प्राथमिक नोटीस बजावली त्यात बागायत आणि हंगामी बागायत अशी नोंद होती. परंतु अंतिम नोटीस पाठवण्यात आली. त्यात खरीप हंगाम म्हणून पाठवली आहे. यामुळे मोबदला कमी मिळणार आहे, शासन निर्णयानुसार पाचपट मोबदला केवळ कागदोपत्री दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र कमी मोबदला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार पाचपट मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.