पुणे: अमरनाथ यात्रेकरूंसमोर अडचणींचा डोंगर; वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी माराव्या लागतायेत रुग्णालयाच्या चकरा!

अमरनाथ यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना यात्रेपूर्वीच अडचणीच्या डोंगरांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी (मेडीकल फिटनेस) यात्रेकरूंना औध जिल्हा रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

संग्रहित छायाचित्र

अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath Yatra) जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना यात्रेपूर्वीच अडचणीच्या डोंगरांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी (Medical certificates) (मेडीकल फिटनेस) यात्रेकरूंना औध जिल्हा रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

अमरनाथ यात्रेच्या नोंदणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अनेक यात्रेकरू पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार औंध जिल्हा रुग्णालयात पुणे शहर व जिल्ह्यातील भाविकांना प्रमाणपत्र मिळते. मात्र औंध रुग्णालयात (Aundh Hospital) त्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. यामुळे यात्रेकरूंना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातून (Sassoon Hospital) वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे अमरनाथ यात्रा ६० दिवसांऐवजी (दोन महिने) फक्त ४५ दिवसांची करण्यात आली आहे. यात्रेची नोंदणी प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.  यात्रा २९ जूनपासून सुरू होणार असून ती १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी भाविकांना काही  वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, ते फक्त औंध जिल्हा  रुग्णालयातच मिळते.  हे रुग्णालय पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या ठिकाणी उपचारासाठी नेहमीच रुग्णांची वर्दळ असते. त्यामुळे यात्रेकरूंना ताटकळत बसावे लागते. नाव न छापण्याच्या अटीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ला सांगितले की, "केंद्र सरकारच्या सूचनेनुसार फिटनेस प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया सुरू आहे. अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरूंना विशिष्ट रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. पुण्याचे फक्त औंध जिल्हा सामान्य रुग्णालयातच हे दिले जाते.’’

राजेंद्र पाटील या ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, ‘‘रुग्णालय व्यवस्थापनाकडून योग्य सेवा दिली जात नाही. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे  सहकार्य मिळत नाही. भाविकांची संख्या मोठी असल्याने प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ससून रुग्णालयात ही सेवा असणे गरजेचे आहे.’’  ज्येष्ठ नागरिक सुनंदा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो. त्यानंतर त्यांनी आम्हाला औंध जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना पुणे शहरातून मध्यवर्ती पेठांमधून औंध रुग्णालयापर्यंतचा लांबचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी खूप वेळ लागतो. तपासण्या करणे, प्रमाणपत्र देणे यासाठी अपुरे मनुष्यबळ रुग्णालयात आहे.’’

"वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येणारे प्रवासी आणि भाविकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. अतिरिक्त ताण असतानाही भाविकांना जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र वेळेत मिळेल यासाठी काळजी घेतली जात आहे,’’ असा दावा औंध जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ येमापल्ले यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest