File Photo
भारतीय प्रशासन सेवेतील माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर गुरुवार ५ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ओळख लपवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मर्यादेपेक्षा अधिक परीक्षा देत फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकरवर खटला दाखल झाला असून या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी तिने केलेल्या अर्जावर हा निर्णय कोर्टाने दिला आहे.
डोळ्यात धूळफेक करून अनेकदा परीक्षेची संधी घेतलेल्या पूजा खेडकर हिच्यावर कारवाई करत यूपीएससीने तिचं आयएएस पद रद्द केलं होतं. शिवाय तिच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. तिच्यावर अटकेची टांगती तलवार असताना तिने अटकेविरोधात कोर्टामध्ये धाव घेतली आहे.
बुधवारी पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात रिजॉईंडर दाखल केले आहे. पूजाने यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचं तिचं म्हणणं आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप यूपीएससीने केला होता.
यूपीएससीच्या तिच्यावरील आरोपांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात पूजा खेडकर म्हणते की, एकदा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाल्यानंतर आणि नियुक्ती झाल्यानंतर यूपीएससीला तिची उमेदवारी अपात्र ठरविण्याचा अधिकार नाही. आपल्या नावात कोणतीही फेरफार केलेली नाही. न्यायालयाने खेडकरला यूपीएससी तसेच दिल्ली पोलिसांच्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी वेळ दिला. यूपीएससीने दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला आहे. खेडकरने आयोग आणि जनतेची फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांनीही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. कारण खेडकरला दिलेला कोणताही दिलासा तपासात अडथळा आणेल आणि या प्रकरणाचा जनतेवर मोठा परिणाम होईल, असे म्हणणे त्यांनी मांडले होते. न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात, यूपीएससीने म्हटले आहे की, खेडकरची कोठडीत चौकशी करणे ही फसवणूक उघड करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.
खेडकरने आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा-२०२२ च्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. ३१ जुलै रोजी यूपीएससीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि भविष्यातील कोणत्याही परीक्षांना बसण्यास प्रतिबंध केला. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे.
पूजा खेडकरने नाव बदलून अनेकदा परीक्षा दिल्या, त्यामुळे यूपीएससीने तिच्यावर कारवाई केली. त्याआधी मसुरी येथील प्रशिक्षण संस्थेने तिचं प्रशिक्षण थांबवलं होतं. राज्य शासनाने एक समिती स्थापन करून तिची चौकशीही केलेली आहे. पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्रातही बोगस असल्याचा आरोप आहे. तिने वेगवेगळ्या रुग्णालयांमधून दोन ते तीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आणि दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेतला, असा तिच्यावर आरोप आहे. एवढंच नाही तर तिने ओबीसी आरक्षणासाठी बनावट कागदपत्र दाखल केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं.
पूजा खेडकरमुळे तिच्या आई-वडिलांचे कारनामेही पुढे आले. तिची आई मनोरमा खेडकर हिने तर पुण्यातल्या मुळशीमध्ये जमिनीच्या वादावरून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला होता. त्या प्रकरणात तिला अटक झाली होती. पुणे शहरातील बाणेर रस्त्यावर मनोरमा खेडकरचं घर आहे. तिथेही तिने फुटपाथवर बांधकाम केल्याचं पुढे आलं, त्यामुळे पुणे पालिकेने तिला नोटीस धाडली.
पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामतीमध्ये वडिलांचं नाव बदलून जमीन खरेदी केल्याचं प्रकरण पुढे आलेलं होतं. शिवाय पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या एका कंपनीतील गैरप्रकार उघड झाले होते. कर न भरल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. आता आयएएस होण्यासाठी बोगसगिरी करणाऱ्या पूजाचे पाय सतत खोलात रुतत चालले आहेत.