PMP News : पीएमपी अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली; ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ची चाचणी करण्यास डेपो मॅनेजर उदासीन

पीएमपी बसचे (PMC Bus) स्टेअरिंग चालकाच्या हातात देताना चालकाने मद्य प्राशन केले आहे का? याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक आगारात ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’चाचणी (Breathalyzer) करणे बंधनकारक आहे. तसे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Sun, 22 Oct 2023
  • 05:11 pm
PMP News

‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ची चाचणी करण्यास डेपो मॅनेजर उदासीन

सेनापती बापट रस्ता प्रकरणानंतरही प्रशासन ढिम्म

अमोल अवचिते

पुणे: पीएमपी बसचे (PMC Bus) स्टेअरिंग चालकाच्या हातात देताना चालकाने मद्य प्राशन केले आहे का? याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक आगारात ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’चाचणी (Breathalyzer) करणे बंधनकारक आहे. तसे आदेश देखील मागच्या महिन्यात पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली असून डेपो मॅनेजर चाचणी करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. (PMP News) 

सेनापती बापट रस्त्यावर एका कार चालकासोबत झालेल्या वादामुळे चिडलेल्या पीएमपीच्या खासगी ठेकेदराच्या चालकाने बेदरकारपणाने बस रिव्हर्स चालवीत प्रवाशांचा जीव टांगणीला लावला. या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चालक मद्यपान करुन बस चालवत होता. असा आरोप देखील प्रवाशांनी केला आहे. चालकावर गुन्हा करण्यात आला आहे. त्यात त्याने मद्यपान केल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. मात्र नागरिकांनी केलेल्या आरोपामुळे पीएमपी प्रशासनाकडून ‘ब्रेथ अॅनालायझर’चाचणी केली जाते का ? हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. याबाबतची सत्यता सिवीक मिररने पडताळणी केली. त्यात कुठेही ही चाचणी केली जात असल्याचे चालकांनी सांगितले नाही. तसेच प्रशासनाने चाचणी केले जात असल्याचा पुरावा देण्यास टाळाटाळ केली. मात्र काही वेळाने पीएमपीचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी चाचणी केल्याचे फोटो पाठवले. 

सिवीक मिररने 'सावधान, तुमता ड्रायव्हर दारुच्या नशेत असू शकतो' या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर पीएमपीच्या अध्यक्षांनी ‘ब्रेथ अॅनालायझर’चाचणी करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यात कामावर असताना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आदेश दिले आहेत. चालक आणि वाहकांची नियमित तपासणी झाल्यास पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. असे नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर देखील पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागातील डेपोंमध्ये ही चाचणी होत नसल्याचे समोर आले आहे.  प्रवासी संख्या वाढविण्यासाठी पीएमपीच्या अध्यक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे अध्यक्षांच्या आदेशाला हरताळ फासण्याचा प्रयत्न कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात १७५० बसच्या माध्यमातून पीएमपीएमएलची सेवा दिली जाते. दररोज साधारण ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या कात्रजवरून बोपदेव घाटमार्गे भिवरी, गराडेमार्गे जाणाऱ्या बसला मागील वर्षी डिसेंबरमध्ये बोपदेव घाटाजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर चालकास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले होते. या घटनेनंतर सर्व आगारांमध्ये चालकांकडे बस देण्याअगोदर त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी करूनच बसची ड्यूटी द्यावी. असे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस चाचणी करण्यात आली. मात्र त्यानंतर चाचणी बंद करण्यात आली होती.

पीएमपीची खागसी ठेकेदारांच्या बस चालकांमुळे बदनामी होत आहे. रस्त्यावर वाद झाला म्हणून कोणी कोणाचा जीव घेत नाही. किंवा तसे वर्तन करत नाही. कोणत्याही चालकाला सेवेत घेताना त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याची गरज आहे. तसेच त्याच्याकडे वाहतुक परवाना आहे का ? हे देखील पाहणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकाला कडक शासन झाले पाहिजे. चालक-वाहकांना योगाचे प्रशिक्षण द्यावे, तसेच त्यांच्यावरील ताण कसा कमी करता येईल हे पाहण्याची गरज आहे.

 - स्वप्नील भंडारी, प्रवासी, प्रतिनिधी

पीएमपी चालक वाहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. रजा घेतली, प्रवाशाने तिकीट काढले नाही किंवा इतर कारणांमुळे कारवाई केली जाते. त्यामुळे त्यांच्यात तणावाचे वातावरण आहे. चालक आणि वाहक हे दोघे पीएमपीचे प्रमुख घटक आहेत. पीएमपीचे चालकांना नेहमीच ट्रेनींग दिले जाते.   

   - सुनिल नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन

वाहक, चालकासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई...

कामावर असताना अल्कोहोलचे सेवन केल्याचे आढळून आल्यास अथवा याबाबतची तक्रार महामंडळाकडे आल्यास तो चालक, वाहक व संबधित सिनियर टाइमकिपर, टाइमकिपर, गॅरेज सुपरवायझर व आगार व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आदेश दिल्यानंतरही चाचणी केली जात नाही. त्यामुळे प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

सेनापती बापट रस्ता प्रकरणानंतरही पीएमपी प्रशासन ढिम्म..

  पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या बसवरील चालकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटकही केली आहे. मात्र त्यानंतरही पीएमपी प्रशासनाने कोणतीह कारवाई केली नाही. चालकाला सेवेतून काढले आहे. त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी उत्तरे दिली जात आहे. तसेच वाहकांना आणि चालकांना अशा प्रकारचे वर्तन केल्यास कोणती कारवाई करणार किंवा याबाबतचे काही आदेश काढले आहेत का असे विचारले असता, रविवार असून सुट्टी असल्याने अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. सोमवारी प्रशासन याबाबत कडक पावले उचलणार असल्याचे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी सांगितले. 

पीएमपीएम एकूण बस - २०८९

स्वमालकीच्या बस - ९९१

ठेकेदारांच्या बस - १०९८

ई-बस - ४५८,

सीएनजी - १५००

डिझेल - २००

पीएमपीचे मनुष्यबळ

चालक - २९५०

वाहक - ४७००

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest