संग्रहित छायाचित्र
महापालिकेकडून सर्व व्यावसायिकांना तसेच काही निवासी नागरिकांना पाणी पुरवठा मीटरद्वारे करण्यात येत आहे. या मीटरनुसार वापरलेल्या पाण्याचे बिल त्यांनी महापालिकेकडे भरणे आवश्यक आहे, परंतु वेळेत बिल भरत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता पाणीपट्टी वेळेत न भरल्यास थकबाकी रकमेवर प्रतिमहा १ टक्के दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मध्ये आठव्या प्रकरणात नियम ४१ नुसार थकबाकीवर प्रत्येक महिन्याला एक टक्के दंडात्मक व्याज आकारण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यानुसार हे व्याज आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु पुणे महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी वसुलीसाठी दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच त्यावर अद्याप कोणताही निर्णय पालिकेने घेतलेला नव्हता. मात्र आता ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असणारी थकबाकी भरण्यासाठी नागरिकांना नियमानुसार ६० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर त्यांच्यावर १ एप्रिल २०२४ पासून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या ३९ हजार ग्राहकांकडे पाणीपट्टीची थकबाकी सुमारे ४५० कोटी रुपये आहे, पण दुबार बिल, मिटर खराब असल्याने चुकीचे बिल जाणे आदी कारणांमुळे ही रक्कम फुगली आहे. खरी थकबाकीही २५० कोटीच्या घरात आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून सर्व ग्राहकांना बिल देण्याची व्यवस्था केली आहे. जर बिल मिळाले नाही तर ३१ जानेवारीपर्यंत लष्कर पाणी पुरवठा विभाग, स्वारगेट, एसएनडीटी, चतुःश्रृंगी पाणी पुरवठा विभाग कार्यालयातून बिल घेऊन जावे. थकबाकी ३१ मार्चपूर्वी जमा करावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांमधील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे बिल आकारणी करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या बोर्डांकडे देखील मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोर्डांसह इतर शासकीय कार्यालयांकडे पाणीपट्टी थकली असून त्यांना ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली. अन्यथा पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे यंदा पाऊस कमी झाल्याने पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. पालिकेकडून पाण्याचे मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कोण किती पाणी वापरते याची माहिती सहज उपलब्ध होत आहे. असे असले तरी ठरवून दिलेल्या प्रतिव्यक्ती पाणी कोट्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असूनही पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी याकडे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे.
ज्या भागामध्ये पाणीवापर प्रतिव्यक्ती २०० एलपीसीडीपेक्षा जास्त आहे, तेथील मिळकतींची तपासणी करून तेथे पाणीवापर जास्त अन् कमी करण्याची कार्यवाही पाणी पुरवठा विभागाकडून करणे अपेक्षित आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत समोर आले आहे. त्यामुळे तातडीने क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्या मिळकतींचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महापालिकेने जादा पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराला गरजेनुसार पाणी पुरवठा केला जाईल आणि मार्चमध्ये कालवा नियोजन समितीच्या बैठकीत त्यावेळचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी कपात होण्याची शक्यता येणार नाही. त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरले तर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार नाही.
पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरात अनेकांनी बेकायदा नळजोड घेतल्याचे समोर आले आहे. शहरातील विविध भागात ९१४ अनधिकृत नळजोड घेतले असल्याची माहिती एल ॲण्ड टी ठेकेदाराने पाणी पुरवठा विभागाला दिली होती. त्यामध्ये नळजोड घेतला आहे, पण मीटर बसविण्यास विरोध केला आहे. तसेच वॉशिंग सेंटरसाठी नळजोड केल्याची माहिती होती. त्यानुसार विभागाने खराडीतील ८४ वॉशिंग सेंटरवर कारवाई केली होती. असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. तसेच अनधिकृत नळजोड घेतलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात विविध झोननुसार अहवाल सादर करण्यात आला आहे. अनधिकृत नळ जोडबाबत एल ॲण्ड टी ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार संबंधित जागेची तपासणी करून अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार बंडगार्डन विभागाने ६९४ अनधिकृत कनेक्शनपैकी ५६३ कनेक्शनवर मीटर बसविले असून, ७९ कनेक्शन बंद केल्याचे सांगितले आहे. तसेच, स्वारगेट १ विभागाने १५९ अनधिकृत कनेक्शनपैकी १५३ अनधिकृत कनेक्शनवर मीटर बसविण्यात आल्याचे सांगितले. स्वारगेट २ विभागाने ६१ अनधिकृत कनेक्शन पैकी ६१ ठिकाणी मीटर बसविले आहेत. तसेच इतर विभागांनी अद्याप कार्यवाही सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागाला सांगितले आहे. यावर तातडीने कार्यवाही करून अनधिकृत नळ जोडबाबत पूर्ण माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.