संग्रहित छायाचित्र
महापालिकेने शहरातील सहा रस्त्यांवर सार्वजनिक वाहतळ धोरण अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जंगली महाराज, फर्ग्युसन महाविद्यालय, ढोलेपाटील , नॉर्थ मेन रोड, औंध डीपी, बालेवाडी हायस्ट्रीट, आणि विमाननगर रस्त्याचा समावेश आहे. येथे चार चाकीला तासाला २० तर दुचाकीसाठी ४ रुपये मोजावे लागतील.
पार्किंगचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासनाकडून याला मान्यता मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर पे अॅण्ड पार्क सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेने २०१८ मध्ये शहरासाठी पार्किंग पॉलिसी राबविण्याकरीता धोरणास मान्यता दिली होती. यानंतर शहरात पे अॅण्ड पार्क करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र निवडणुका आणि राजकीय भूमिकेमुळे शहरात या योजनेला मुहूर्त अद्याप मिळाला नाही.
शहरात गेल्या सहा वर्षांपासून पार्किंग धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे एका सामाजिक संघटनेकडून नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने याबाबत महापालिका प्रशासनाला खुलासा विचारला. महापालिकेने याबाबतची वस्तुस्थिती शासनाला कळवली आहे.
महापालिका प्रशासनाने रस्त्याची निवड करताना रहदारी आणि व्यापारी पेठांचा समावेश असलेले रस्ते निवडले आहेत. मोठ्या प्रमाणावर रहदारी असणारे हे रस्ते आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर तासाला २० रुपये तासाला पार्किंग शुल्क चारचाकी वाहनांसाठी आकारण्यात येणार आहे, दुचाकीसाठी ४ रुपये तासाला नागरिकांना मोजावे लागतील.
शहरातील रस्त्यांवर पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी २०१८ मध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती करण्यात आली. या समितीने सहा महिन्यांमध्ये रस्त्यांचा अभ्यास करून सर्वसाधारण सभेसमोर अहवाल द्यावा. त्याचबरोबर पाच रस्ते निश्चित करून धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या समितीकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी झाली नाही.
पार्किंग धोरण निर्णय लवकर
शहरात पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. या धोरणासाठी वाहतूक पोलिसांनासुध्दा विचारण्यात आले आहे. शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निर्णय न घेतलेल्या प्रस्ताव शासनाकडून मान्य करण्यात मिळणे आवश्यक आहे. शहराच्या वाहतुकीला शिस्त आणि वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी संपूर्ण शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, आता राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पार्किंग धोरणाचा लवकर निर्णय होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या रस्त्यांची शिफारस
महापालिका प्रशासनाने शहरातील ३२ रस्त्यांचा अभ्यास करून यापैकी सहा रस्त्यांवर पार्किंग पॉलिसीचे धोरण प्रायोगिक तत्त्वावर लागू करता येईल असे ठरवले . यामध्ये जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्याल रस्ता, ढोलेपाटील रस्ता, नॉर्थ मेन रोड, औंध डीपी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट रस्ता आणि विमाननगर रस्त्याचा समावेश आहे. सर्वसाधारण सभा सध्या अस्तित्वात नसल्यामुळे राज्य सरकारने याबाबत निर्णय घेऊन महापालिका प्रशासनाला कळवावे अशी विनंती करण्यात आली आहे.