संग्रहित छायाचित्र
दिलीप कुऱ्हाडे
येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerawada Jail) तीस बराकींमध्ये २३२३ कैदी (prisoners) क्षमता आहे. मात्र याठिकाणी तब्बल सहा हजार कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृहाच्या शेजारील तीस (Pune News) एकरात तीन हजार कैदी क्षमता असलेले केवळ कच्च्या कैद्यांसाठी नवीन कारागृह प्रस्तावित आहे. यासाठी पावणे दोनशे कोटो रूपयांचा निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, पोलीस गृहनिर्माण महामंडळ नवीन कारागृह बांधणार असल्यामुळे कारागृहाला अद्याप मुहूर्त मिळाले नाही.
कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोन मध्ये सहा बराक तर किशोर विभागात तीन बराक आहेत. यासह अंडासेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशांना दाटीवाटीने विविध बाराकींमध्ये ठेवले आहे. यातील जवळपास सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे कच्च्या कैद्यांची संख्या विचारात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र कारागृहाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने कारागृह प्रशासनाच्या संमतीने राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, या प्रस्तावाला खो घालत गृह विभागाने कारागृह बांधण्यासाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाला नव्याने प्रस्ताव तयार करायला लावले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षांपूर्वी केलेल्या डिझाईन मध्ये कारागृहाची इमारत तळ आणि पहिला मजला असणार होता. समोरच्या बाजुला प्रशासकीय इमारत, वरिष्ठ तुरूंगाधिकारी, तुरूंग अधिकारी यांचे कार्यालय असणार होते. मध्यवर्ती भागात सेंट्रल किचन, गिरणी, किचन शेजारी दोन बराक, धान्य गोदाम, रुग्णालय, प्रयोगशाळा, औषधांची खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोली,पन्नास खिडक्यांची मुलाखत कक्ष,ग्रंथालय, प्रतिक्षालय, सराईत गुन्हेगारांसाठी अतिसुरक्षित तीस खोल्या आदी सोईसुविधा असणार होत्या. तसे डिझाइन सुध्दा गृह विभागाला पाठविण्यात आले होते.
“येरवडा मध्यवर्ती कारागृहा मधील बंदी संख्या पाहता येथे नवीन कारागृहाचान नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. प्राथमिक चर्चा, इमारतीचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. लवकरच निधी मंजुर होताच नवीन कारागृहाचे निविदा प्रसिद्ध करून बांधकाम सुरू होणार आहे.”
- शहाजी जाधव, कार्यकारी अभियंता, पोलीस गृहनिर्माण महामंडळ
नवीन कारागृह तीस एकरात !
येरवडा मध्यवर्ती कारागृह - ६५ एकरांमध्ये ( २३२३ बंदी क्षमता) तेथे पक्के कैदी तर नवीन कारागृह ३० एकर मध्ये तळ आणि पहिला मजला( ३००० बंदी क्षमता) असुन यामध्ये कच्चे कैदी ठेवले जाणार आहेत. अट्टल गुन्हेगारांसाठी- अतिसुरक्षित ३० खोल्या बाहेरील सिमाभिंत २१ फूटी तर आतील सिमाभिंत दहा फूटी असणार आहे .
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.