आता क्यू-आर कोडद्वारे काढा पीएमपीचे तिकिट
पीएमपीच्या प्रवाशांना तिकीटासाठी सुट्ट्या पैशांसाठी ओढाताण करावी लागत होती. ऑनलाईन पेमेंटची सुविधा अगदी रस्त्यावरील विक्रेत्याकडे देखील उपलब्ध आहे. त्यामुळे पीएमपीच्या बसच्या तिकीटासाठी कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार पीएमपीने ई- तिकीट मशीन मधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरु करण्याबाबत १५ दिवसांत प्रणालीविषयी तांत्रिक बाबींची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली. या चाचणीला यश आल्याने आता ही सुविधा सर्व मार्गांवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आजपासून (रविवार) ही सेवा लागू होणार आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते कोथरूड आगारात रविवारी दुपारी १२ वाजता ई –तिकीट कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रसिध्दीपत्रकद्वारे दिली. वाहकाच्या ई – तिकीट मशीनमध्ये तिकीट रकमेचा क्यू-आर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. त्याच बरोबर कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महामंडळामध्ये २०१५ पासुन ई – तिकीट मशीन मधून तिकीट प्रणाली सुरु करण्यात आलेली होती. परंतु डिजिटल पेमेंट सुविधा प्रवाशांकरिता सुरु करणे प्रलंबित होते. अखेर प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाकडून ई- तिकीट मशीन्स मधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरु करण्याबाबत १५ दिवसांत प्रणालीविषयी तांत्रिक बाबींची पूर्तता करून अखेर यशस्वी प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली त्याला यश आले आहे. रविवार पासून सुरू करण्यात येत आहे. ई मशीन वारंवार हॅंग होत आहेत. त्यामुळे तिकीट निघण्यास वेळ लागतो. आता कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे तिकीट निघण्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे वाहकांनी 'सिवीक मिरर' शी बोलताना सांगितले.
ऑन लाईन सुविधांचे हे फायदे
तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांची समस्या पासून मुक्तता
वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार
महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा होणार
लवकरच पीएमपीचे मोबाईल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, प्रवासाचे नियोजन व मोबाईल टिकिटिंग सुविधा
प्रवासाचे नियोजन व मोबाईल टिकिटिंग सुविधा पीएमपीकडून सुरु करण्यात येणार आहे.
डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार
ई तिकीट मशीनच्या सध्या या आहेत समस्या..
ई तिकीट मशिन वारंवार बंद पडणे
मशीनमध्ये बिघाड होत असल्याने नियोजित वेळेत मार्गस्थ न झाल्याने प्रवाशांची गैरसोय
पीएमपीचे आर्थिक नुकसान होत आहे
मशीनमधील प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली, मात्र दखल न घेतली नाही
रोल पेपरच्या दर्जात बदल होत असल्याने अर्धवट प्रिंट निघणे
डेपोच्या ३ किलोमीटर परिसरातमध्ये वाहकाला दुसरी ई- तिकीट मशीन मार्गावर पुरविण्यास अपयश, पास निघण्यास अडचणी
प्रशासनाने ई तिकीट मशीनच्या दुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे वाहकांवर ताण येणार असून काम उरकणार नाही. प्रवासादरम्यान वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेत तिकीट देणे आवश्यक असणार आहे. मशीन वारंवार हॅंग होणे, तिकीट बाहेर येण्यास वेळ लागणे, प्रोसेस न होणे, मशीनमध्ये वाढवलेले पर्याय यामुळे वेळ लागतो. त्यामुळे वाहकाला आणि प्रवाशाला दोघांना त्रास सहन करावा लागत आहे. सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटणार असून आता तांत्रिक अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- सुनिल नलावडे, सरचिटणीस, पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन
ई-तिकीट मशीनमध्ये येणाऱ्या सर्व समस्या सोडविल्या आहेत. १५ दिवसांत चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कोणत्याही अडचणी जाणवल्या नाहीत. त्यामुळे पीएमपीने रविवार पासून कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ही सुविधा सुरु केली जाणार आहे.
- सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी.