File Photo
पालिकेच्या पथ विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली होती. पावसामुळे हॉटमिक्स मिळण्यात अडचण येत होती. तसेच येरवड्यातील हॉटमिक्स प्रकल्पाच्या मर्यादेमुळे खड्डे बुजवा मोहीम रेंगाळली. आता राष्ट्रपतींचा आणि अन्य व्हीआयपींचे दौरे असल्याने काही करून खड्डे बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे पथ विभाग दोन खासगी कंपन्यांकडून हॉटमिक्स खरेदी करणार असून त्याची तयारी सुरू केली आहे. याचा निर्णय झाल्यानंतर खड्डे बुजवण्यास वेग येईल.
मुसळधार पावसाने रस्त्यांची वाट लागली असून खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू आहे. पालिकेने मध्यंतरी महिनाभरात चार हजार सातशे ६६ खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. पाऊस सुरूच असल्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला मर्यादा येत आहेत, असे पथ विभागाचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यावर मोठे खड्डे दिसत असल्याने पालिकेने नेमके खड्डे कोणते बुजवले असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित करण्यात आला. आता सणासुदीचे दिवस आणि व्हीआयपींच्या दौऱ्यांमुळे काही करून खड्डे बुजवा असा वरिष्ठ पातळीवरून आदेश आला आहे.
त्यामुळे पालिकेने युध्द पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम पुन्हा हाती घेतले आहे. मात्र, खड्डे वाढत असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच विविध शासकीय संस्था, महापालिकेतर्फे पायाभूत सुविधासाठी खोदाईची कामे हाती घेण्यात येतात. त्यामुळे आणि सततच्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
२६ ऑगस्टपासून बुजवलेले खड्डे
बुजवलेल्या एकूण खड्ड्यांची संख्या ४३२
वापरलेला डांबरी माल १३३४.७७ मेट्रिक टन
एकूण क्षेत्रफळ १९८१ चौरस मीटर
दुरुस्त केलेल्या चेंबरची संख्या ३६
डागडुजीसाठी दीड कोटी
राजपूत झोपडपट्टी ते बाबा भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्त्याची चाळण झाली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम नव्याने करता येत नाही. त्यामुळे रस्त्याची डागडुजी केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च होणार आहेत. या खर्चाला वित्त समितीने मान्यता दिली आहे. येत्या आठवड्यात कामासाठी निविदा प्रसिध्द केली जाणार आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून वेगाने सुरू आहे. रात्रीच्या वेळी खड्डे बुजवले जात आहेत. पावसामुळे खडी ओलसर राहिल्याने हॉटमिक्स मिळण्यास मर्यादा येत आहे. येरवड्यातील हॉटमिक्स प्रकल्पाच्या मर्यादेमुळे दोन खासगी कंपन्यांकडून हॉटमिक्स घेण्याची तयारी सुरू केली आहे.
- अनिरुध्द पावसकर, प्रमुख,
पथ विभाग, पुणे महापालिका.