पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. त्यात अशास्त्रीय गतिरोधक उभारल्याने अनेक वाहन चालकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडून नवीन गतीरोधक उभारणे बंद केले असून अशास्त्रीय गतीरोधक काढून टाकण्यात येणार आहेत. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ज्या प्रकारे अपघात होतात. तितक्यात प्रमाणात अशास्त्रीय गतीरोधक उभारल्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. तसेच यामुळे वाहन चालकांच्या पाठदुखी सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने अनेक दिवसांपासून नव्याने गतीरोधक उभारणे बंद केले आहेत. तसेच नागरिकांनी मागणी केली असे गतीरोधक उभारता येणार नाही असे देखील सा्ंगितले जाते. वाहन चालकांचा त्रास कमी करण्यासाठी आणि शहरातील अनावश्यक, अशास्त्रीय गतीरोधकांची माहिती गोळा करण्यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण केले जाणार असून गतिरोधकांसाठी मोबाईल अप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे गतिरोधकांचे ट्रॅकिंग केले जाणार आहे.
शहरी भागात अशास्त्रीय गतिरोधकांमुळे वाहतुकीची गती मंदावण्यासोबतच वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना पाठीच्या दुखण्याचा त्रास सोसावा लागतो. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आल्यानंतर न्यायालयाने इंडियन रोड कॉंग्रेसच्या मानकानुसार गतीरोधक उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, या निर्णयानंतर सुरवातीचे काही वर्षे इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसार गतीरोधक उभारण्यावर भर देण्यात आला. परंतू रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरणानंतर अनेकठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना पाठीच्या दुखण्याचा त्रास सोसावा लागत आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार जुन्या हद्दीत तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील सुमारे दीड हजार किलोमीटर रस्त्यांवर दोन हजारांहून अधिक गतीरोधक आहेत. गेल्या चार ते पाच वर्षात सेवा वाहीन्यांसाठी रस्त्यांची खोदाई करून खोदाईच्या ठीकाणी पॅचवर्क करण्यात आले आहे. अनेक गतीरोधक हे पावसाळ्यात बांधाचे काम करत असून त्यामुळे गतिरोधकांजवळ पाणीसाठून रस्त्यात मुरून खड्डे पडत आहेत. तर काही ठिकाणी गतीरोधकांच्या अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी गटारांमध्ये जाण्यास अडथळा होतो. तसेच मागील काही वर्षात वाहनांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याने वाहतुकीचा वेग कमी होत असून गतिरोधकांमुळे त्यात अधिकच भर पडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
शहरातीलस गतिरोधक हटविण्यात बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. याद्वारे माहिती गोळा करुन चुकीचे गतिरोधक हटविले जाणार आहेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्त करता येतील का याची चाचपणी केली जाणार आहे. तसेच गतिरोधकांसाठी मोबाईल अप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे गतिरोधकांचे ट्रॅकिंग केले जाणार आहे.
- निखिल मिजार, पथ विभागाचे वाहतूक व्यवस्थापक, महापालिका.