वाघोलीत किरकोळ वादातून लाथा, दगडाने मारहाण
नितीन गांगर्डे
किरकोळ वादामधून विवाहित महिलेला धमकी देत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तू कसा संसार करते तेच पाहतो असे म्हणत विवाहितेच्या पोटावर लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार वाघोलीमध्ये घडला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
२२ वर्षाच्या एका विवाहितेने लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुधवार, दि ३१ मे रोजी पोलिसांनी राहुल मुकेश पवार आणि करण मुकेश पवार या दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही वाघोली येथील विटळकर चाळीत राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि मारहाण करणारे आरोपी हे एकाच परिसरात जवळ जवळ राहतात. फिर्यादी घराजवळील सार्वजनिक शौचालयातून घरी जात होत्या. त्यावेळी सोबत त्यांची आई होती. त्यावेळी आरोपी राहुल पवार आला. त्याने या दोघी महिलांना रस्त्यामध्ये अडवले. फिर्यादी महिलेच्या आईला तो शिवीगाळ करू लागला. त्याने "तुझी पोरगी सुखाचा संसार कसा करते तेच पाहतो" अशी धमकी दिली. त्यावेळी किरकोळ भांडणांमधून त्याने गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारली. या लाथेचा मार महिलेचा पोटावर चांगलाच लागला होता. राहुल पवार आणि करण पवार या दोघांनीही फिर्यादी आणि आईला दगड फेकून मारले. शुक्रवार दि २६ मे रोजी रात्री ९ वाजता हा प्रकार घडला .
गर्भवती महिला महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने पोटात दुखण्याचा त्रास होऊ लागला. पोटावर दगड आणि लाथ मारल्ल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. महिलेस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. नंतर वाघोली येथून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान महिलेचा गर्भपात झाला. बुधवार दि ३१ मे रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा भारतीय दंड विधानातील कलम ३१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत.