मिळकतकर विभागाचा पुणेकरांना जाच; ‘पीटी ३’ अर्ज भरूनही मिळेना सवलत, २२ हजार मिळकतदारांना त्रास

मिळकतदारांनी ‘पीटी ३’ अर्ज सादर केल्यानंतर पुणे महापालिकेकडून मिळकतकरात सवलत दिली जाते. मात्र हा अर्ज सादर करूनदेखील तसेच करात ४० टक्के सवलत मिळण्यास पात्र असतानादेखील कोणतीही सवलत दिली जात नाही.

संग्रहित छायाचित्र

उडवाउडवीच्या उत्तरांना नागरिक त्रासले, सवलतीची बिले दिल्यावरच कर भरण्याचा पवित्रा

मिळकतदारांनी ‘पीटी ३’ अर्ज सादर केल्यानंतर पुणे महापालिकेकडून मिळकतकरात सवलत दिली जाते. मात्र हा अर्ज सादर करूनदेखील तसेच करात ४० टक्के सवलत मिळण्यास पात्र असतानादेखील कोणतीही सवलत दिली जात नाही. मिळकतकर विभागाच्या या जाचाला पुणेकर त्रासले आहेत.

मिळकतकरात सवलत देण्याची प्रक्रिया सुरू असून पुढच्या बिलावेळी ती दिली जाईल, असे सांगून पूर्ण रकमेचा कर भरून घेतला जात आहे. मात्र सवलत कधी दिली जाणार याची माहिती मिळकतकर विभागाकडून सांगितली जात नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिक वैतागले आहेत. सवलत दिली जाणार आहे नाही, हे एकदाचे सांगून मिळकतकर विभागाने रडगाणे बंद करावे, असा संतापजनक पवित्रा मिळकतदारांनी घेतला आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार पुण्यातील मिळकतधारकांना २०१८ मध्ये रद्द करण्यात आलेली ४० टक्के करसवलत पुन्हा लागू करण्यात आली आहे. ही सवलत २०१९ पासून लागू झाली आहे. त्यानुसार जीआयएस सर्वेक्षणानंतर आणि १ एप्रिल २०१९ नंतर ज्यांच्या मिळकतींची नोंद झालेली आहे, अशांना ४० टक्के सवलत नाही. त्यांनी ती पुन्हा मिळावी यासाठी रहिवासी पुरव्यांसह ‘पीटी ३’ अर्ज भरावा, असे आवाहन पुणे महापालिकेने केले होते. त्याप्रमाणे संबंधित मिळकतदारांकडून महापालिकेला अर्ज केला आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने या मिळकतदारांना करात सवलत देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांना देण्यात आलेल्या मिळकतकराच्या नोटिशीमध्ये कोणतीही सवलत देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने महापालिकेच्या मिळकरकर विभागाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाने पाठविलेल्या नोटिसांनुसार मिळकतदारांना कर भरण्याची सक्ती केली जात आहे. परंतु सवलतीबाबत विचारले असता, ‘‘त्यावर काम सुरू असून सवलत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही आधी पूर्ण रक्कम भरा, मग प्रक्रिया पूर्ण झाली की पुढच्या वर्षीच्या करात ती सवलत दिली जाईल,’’ असे सांगितले जात आहे. परंतु गेल्या सात ते आठ वर्षांपासून हेच सुरू आहे. दरवेळी कर भरण्यास गेले की नव्याने अर्ज भरून द्यावा लागतो. ती तीच प्रक्रिया नेहमी करावी लागत आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे मिळकतदरांचे म्हणणे आहे. महापालिकेने त्यांच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये सुधारणा करून घ्यावी. तसेच ‘पीटी ३’ अर्ज सादर केल्यानंतर करात मिळणारी ४० टक्के सवलत द्यावी, त्यानंतरच बिल देण्यात यावे, अन्यथा महापालिकेला इच्छा असूनदेखील आमच्याकडून कर भरला जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे मिळकतदारांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाने केलेल्या आवाहनानुसार आम्ही ‘पीटी ३’ अर्ज सादर केला आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही सवलत देण्यात आली नाही. विनाकारण मिळकतदारांना त्रास दिला जात आहे. याबाबत चंदननगर येथील मिळकतकर विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता, कोणतीही माहिती दिली जात नाही. प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. गेल्या तीन-चार वर्षे केवळ प्रक्रियाच कशी काय सुरू राहू शकते? मिळकतकर विभागाचा कारभार सुधारत का नाही, असे प्रश्न आम्हाला पडले आहेत. मिळकतदारांना महापालिकेकडून समान न्याय दिला जात नाही.
- योगिता अंबाडे, नागरिक

‘पीटी ३’ अर्जात नमूद केल्याप्रमाणे सवलत देणे आवश्यक आहे, मात्र गेल्या तीन वर्षांपासून महापालिका उडवाउडवीची उत्तरे देत आहे. आमच्या शेजारील मिळकतदारापेक्षा आम्हाला जास्तीचा कर आकारला जात असल्याची भावन मनात निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळी ही सवलत पुढच्या वर्षी दिली जाईल, असे सांगितले जाते, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. महापालिकेने सवलत दिली तरच आम्ही यंदा कर भरणार आहोत.
- कथा माहेश्वरी, नागरिक

‘पीटी ३’ अर्ज भरलेल्या प्रत्येक मिळकतदाराला सवलत दिली जाते. मिळकतकर विभागाच्या प्रणालीमध्ये ही सवलत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेच्या एकूण २२ हजार मिळकतदारांना ही समस्या येत आहे. प्रणालीमध्ये दुरुस्ती होण्यास अडथळा येत असल्याने आता ही प्रक्रिया ऑफलाईन केली जाणार आहे. मिळकतदारांनी काळजी करू नये. आता ज्याप्रमाणे बिल पाठवले आहे, त्याची पूर्ण रक्कम भरावी. ही समस्या दूर झाल्यानंतर मिळणारी सवलत पुढच्या बिलावेळी दिली जाईल.
-  माधव जगताप, करआकारणी आणि करसंकलन विभागप्रमुख, पुणे महापालिका

करात सवलत दिली जाणार, असे सांगितले जाते. मात्र मिळकतकर विभागाने यातून नागरिकांना त्रासच देणे सुरू केले आहे. इतरांना सवलत दिली जात आहे. मात्र आमच्यावर महापालिका अन्याय करत आहे.  प्रत्येक वर्षी खोटी आश्वासने दिली जात आहेत. सवलत दिली जाणार नसेल तर महापालिकेने तसेच स्पष्ट करावे.
- नवीन त्रिपाठी, नागरिक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest