कात्रज गावठाण येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करून ही जागा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला ( कात्रज डेअरी ) देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाला स्थानिक नागरिकांमधून विरोध होऊ लागला आहे. तसेच राजकीय पक्षांनी देखील विरोध करण्यास सुरवात केली आहे. युवा सेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या जागेचे आरक्षण बदलण्यास विरोध केला असून निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा तसेच कात्रज डेअरी समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेच्या शहर सुधारणा समितीन मैदानाचे आरक्षण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ही जागा कात्रज डेअरीला दिला जाणार आहे. पंरुत त्यापूर्वी या निर्णयावर पुणेकरांकडून हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. याचा अहवाल तयार यावर निर्णय घेतला जाणार आहे.
शहराच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात सुमारे ८ ते १० हजार बांधकामांचे प्रकल्प सुरु आहेत. वाढती लोकसंख्येमुळे आता मैदाने दिसून येत नाहीत. त्यामुळे तरुणांनी मुलांनी खेळावे कुठे असा प्रश्न पडला आहे. तसेच शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने पायाभूत सुविधांवरील ताण वाढत आहे. याचे नियोजन करायचे असेल तर विकास आराखड्यानुसा आरक्षणाचा विकास होणे आवश्यक आहे. दक्षिण पुण्यातील धनकवडी बालाजी नगर कात्रज परिसर दाट लोकवस्तीचा आहे. लोकवस्तीच्या तुलनेने या भागात खेळाची मैदानी कमी आहेत. मैदाने कमी असल्यामुळे ही पिढी मोबाईलऐ आणि इतर गैर मार्गावर वाहत चालली आहे. तसेच पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुणे शहरात अनेक विद्यार्थी हे एमपीएससी, यूपीएससी तसेच सरकारी नोकऱ्यांच्या शिक्षणासाठी पुणे शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना सराव करण्यासाठी बाबुराव सणस मैदान हेच पूर्ण विकसित मैदान महापालिके तर्फे उपलब्ध आहे. कात्रज पासून बाबुराव सणस मैदानाचे अंतर हे खूप लांब असल्यामुळे कात्रज मधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामूळे ही जागा मैदानासाठीच आरक्षित ठेऊन तेथे सुसज्ज असे क्रीडा संकुल बांधण्यात यावे. अशी मागणी युवा सेनेची आहे.
महापालिकेने खेळाचे आरक्षण बदलण्याचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा युवा सेनेच्या माध्यमातून रस्त्यावरुन उतरुन तसेच डेअरीच्या परिसरात उतरुन आंदोलन केले जाईल. नव्या पिढीला मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदाने आवश्यक आहेत. त्यामुळे याचे राजकारण न करता तसेच एका संस्थेला फायदा होईल असा निर्णय घेण्यात येऊ नये.
- परेश खांडके, पुणे उपशहर समन्वयक ( युवासेना ) शिवसेना.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे स्पष्टीकरण...
मैदानाचे आरक्षण काढून ही जागा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वापरासाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर याला विरोध होऊ लागला आहे. त्यावर दूध संघाने स्पष्टीकरण दिले आहे. ही जागा पूर्वीपासून कात्रज डेअरीचीच असल्याचा दावा संघाने केला आहे. या ठिकाणी डेअरीच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने ही जागा आवश्यक असल्याने विकास आराखड्यात बदल केला जात आहे. आम्ही कायमच पुण्याच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. सातारा रस्ता व कात्रज चौक ते मैत्री चौक या दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी ४ एकर जागा दिली आहे असे दूध संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने १९६९ मध्ये ही जागा दूध संघास दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व निर्मितीसाठी दिलेली आहे.
२०१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा दूध संघाच्या नावाने केली. या जागेत प्रशासकीय इमारत, उत्पादन प्रक्रिया प्लांट, सर्व्हीसेस ब्लॉक इमारत, खरेदी व स्टोअर इमारत, प्रशिक्षण केंद्र कामगार वसाहत, गोठा आदीचा समावेश आहे, असे दूध संघातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच पुणे महापालिकेचा डीपी करताना २०१५ मध्ये कात्रज डेअरीच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त, नगररचना संचालक, नगरअभियंता यांच्या त्रिसदस्यीय समितीने हे आरक्षण काढून टाकून हा भाग निवासी केला होता. मात्र, २०१६ च्या सुधारित विकास आराखड्यामध्ये महापालिकेने पुन्हा खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले. असेही संघाने सांगितले आहे.