आजी-आजोबांनाही मोबाईलचे व्यसन; सोशल मीडियाचे बळी ठरत असल्याची नातवंडांची तक्रार

पुणे शहरातील तज्ज्ञांनीच हे निरीक्षण नोंदवले असल्याने त्याबाबतचे गांभीर्य वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक विशेषत: सोशल मीडिया ॲॅप्सचा वापर करणारे आजी-आजोबा स्क्रीन ॲडिक्शनला अधिकाधिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 13 Sep 2024
  • 12:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तज्ज्ञांच्या मते, आरोग्यविषयक चिंता आणि एकटेपणामुळे वाढले ज्येष्ठ नागरिकांचे मोबाईलवरील अवलंबित्व, मदतीसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना

नोझिया सय्यद

पुणे: मोबाईलचे व्यसन आता फक्त लहान मुले आणि किशोरवयीनांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही त्याची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे वास्तव समोर आले आहे.  

शहरातील तज्ज्ञांनीच हे निरीक्षण नोंदवले असल्याने त्याबाबतचे गांभीर्य वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक विशेषत: सोशल मीडिया ॲॅप्सचा वापर करणारे आजी-आजोबा स्क्रीन ॲडिक्शनला अधिकाधिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

माजी निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोगतज्ञ आणि आता जेरियाट्रिक केअरमधील तज्ज्ञ डॉ. स्वाती भावे याबाबत ‘सीविक मिरर’ला माहिती देताना म्हणाल्या, ‘‘आम्ही कौटुंबिक संस्कृतीत एक आमूलाग्र बदल पाहिला आहे, मोबाइल व्यसन लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पसरले आहे. आजी-ओजोबांबाबत आता ही मोठी समस्या ठरली आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे पहिले आजी-आजोबा समुपदेशन केंद्र स्थापन केले आहे.’’ 

आजी-आजोबांच्या समुपदेशनासाठी नातवंडांचा पुढाकार
“अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा आजी-आजोबा यांना त्यांच्या नातवंडांनी आमच्याकडे आणले आहे. या ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलचे व्यसन होते. आपल्या आजी-आजोबांची आजच्या नातवंडांना किती काळजी आहे, हे यावरून दिसून येईल. आधी आजी-आजोबा नातवंडांच्या आरोग्याबाबत जागरूक असायचे. आता मात्र काळजीचे कौटुंबिक चक्र बदलत असल्याचे यावरून दिसून येते,” असे निरीक्षणदेखील डॉ. स्वाती भावे यांनी नोंदवले.

एका व्यापक संदर्भात डॉ. भावे यांनी स्पष्ट केले की, आजच्या जगात सुधारित आरोग्यसेवेमुळे लोक ७० ते ८० वर्षे चांगले जगतात. बऱ्याच ज्येष्ठांना चांगले आरोग्य लाभले आहे. त्यांना प्रवास आणि लक्झरी खरेदी यांसारखे छंद जोपासण्याचे आर्थिक स्वातंत्र्य आहे. काहींना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास नक्कीच असतो. हा गट अनेकदा त्यांच्या मुलांवर अवलंबून असतो. त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यास ज्येष्ठ नागरिकांमध्ये निराशा आणि एकाकीपणा येऊ शकतो. हा एकाकीपणा दूर करण्यासाठी ते मोबाईलच्या आहारी जातात.

कोविडचा परिणाम
डाॅ. भावे यांच्या नेतृत्वाखालील असोसिएशन ऑफ ॲडॉलेसेंट अँड चाइल्ड केअर इन इंडिया (एएसीसीआय) विविध कार्यक्रमांद्वारे पालक, मुले, तरुण आणि शिक्षक यांच्यासोबत व्यापकपणे काम करत आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळात, ज्येष्ठ नागरिकांनाही मार्गदर्शन आणि समुपदेशनाची गरज असल्याचे आढळून आले. कोविडच्या काळात जगात जे झपाट्याने बदल झाले, त्याच्या कचाट्यात ज्येष्ठ नागरिकही सापडले आहेत. यामुळे आम्हाला हे जाणवले की आजी-आजोबांनाही समुपदेशनासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. आम्ही अशा आजी-आजोबांसाठी वेबिनार आणि वैयक्तिक समुपदेशन सत्रांचे आयोजन करतो, त्यांच्या समस्यांचे निराकरण करतो आणि त्यांना आधुनिक जगाशी जुळवून घेण्यास मदत करतो आणि त्यांच्या स्क्रीनच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी मदत करतो,’’ डाॅ. भावे यांनी सांगितले.  

“मोबाईलचे व्यसन असलेले सरासरी पाच रुग्ण दररोज आमच्याकडे येतात. पाहतो. यात बहुतांश मुलांचा समावेश असतो. आता मात्र यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणही लक्षणीय दिसत आहे,” असे केंद्रातील समुपदेशक डॉ. बागेश्री देवकर यांनी निदर्शनास आणून दिले.

पालक काम करत असल्याने आणि अनेकदा त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी  आजी-आजोबांकडे येते. वृद्धत्व, गतिशिलतेच्या समस्या आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असताना हे ज्येष्ठनागरिक स्क्रीनच्या व्यसनाला बळी पडले आहेत.
- डॉ. बागेश्री देवकर, समुपदेशक, आजी-आजोबा समुपदेशन केंद्र

आम्ही समुपदेशन सत्रांमध्ये कौटुंबिक सहभागाला प्रोत्साहन देतो. कारण ज्येष्ठांना त्यांच्या मोबाइल उपकरणांवरील अवलंबित्वावर मात करण्यासाठी प्रियजनांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. त्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक आजी-आजोबांची या व्यसनातून सुटका झाली आहे.
- डॉ. स्वाती भावे, जेरियाट्रिक केअर तज्ज्ञ

Share this story

Latest