महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करणार

राज्यातील प्रत्येक व्यक्तीला चांगले उपचार मिळावेत, तसेच मोफत उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारसह महापालिककेडून प्रयत्न केले जात आहे. सोबतच नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका १९ ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यातील प्रत्येक व्यक्तीला चांगले उपचार मिळावेत, तसेच मोफत उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारसह महापालिककेडून प्रयत्न केले जात आहे. सोबतच नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका १९ ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करणार आहे. त्यामुळे नागरिकांना अल्प दरात औषधे विकत घेता येणार आहेत.

राज्य शासनाने नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्योरमेंट अँड प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कोऑपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेड (नॅकॉफ) या संस्थेची निवड केली आहे. या संस्थेला औषधांची दुकाने सुरु करण्यासाठी महापालिकेकडून जागा भाडेकराराने उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या जागेचे भाडे महापालिकेला मिळणार आहे. महागड्या औषधांच्या तुलनेत ही औषधे जवळपास ७० ते ८० टक्के स्वस्त असतात. महापालिकेने शहरात अशा प्रकारची मेडिकल सुरू करावीत अशी चर्चा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाली. सहा वर्षांपूर्वी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जेनेरिक औषधांचे दुकान सुरू केले आहे. त्यानंतर आता राज्यसरकारने याबाबतचे आदेश काढण्यात आल्यानंतर महापालिकेने ही कार्यवाही सुरू केली आहे. असे महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

वाढत्या महागाईचा सामना करताना नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात औषधांच्या किमती वाढल्या असल्याने उपचार घेणे आवाक्या बाहेर चालले आहे. औषधे घेताना कोणतीही तडजोड करता येत नाही. काही करुन औषधे घ्यावीच लागतात. त्यामुळे मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. महापालिकेच्या तसेच राज्य सरकारच्या माध्यामातून मोफत औषधे तसेच उपचार दिले जातात. मात्र काही औषधे ही खासगी औषधांच्या दुकानामध्येच मिळतात. ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधांच्या किमती तुलनेने कमी असल्याने याचा मोठ्या प्रमाणात रुग्णांना फायदा होईल. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही दुकाने असल्याने ती २४ तास खुली असणार आहेत.

डॉ. पवार म्हणाले की, ''राज्य सरकारकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसा जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यासाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. जेनेरिक औषधांची दुकाने केवळ महापालिकेच्या रुग्णालयात असली तरी या दुकांनामधून इतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांदेखील औषधे विकत घेता येती. यासोबतच महापालिकेच्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये नागरिकांना मोफत उपचार आणि औषधे पुरवठा केला जातो.''

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest