पुणे महापालिकेत दिव्यांग प्रमाणपत्रांची बोगसगिरी

पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण आणि देखभाल दुरूस्ती विभागातील शाखा अभियंता आकाश ढेंगे यांचाकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे समोर आले आहे. या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत पुणे महापालिकेकडे लेखी तक्रार आली असून त्यांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 13 Sep 2024
  • 03:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एका शाखा अभियंत्याकडे एकाच डॉक्टरने दिलेली दोन प्रमाणपत्रे असल्याचे उघडकीस, तक्रारीत सखोल चौकशी करण्याची मागणी

पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण आणि देखभाल दुरूस्ती विभागातील शाखा अभियंता आकाश ढेंगे यांचाकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे समोर आले आहे. या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत पुणे महापालिकेकडे लेखी तक्रार आली असून त्यांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

ढेंगे यांच्याकडे २०१६ मध्ये ६३ टक्के दिव्यांग असल्याचे तर २०१७ मध्ये ५५ टक्के दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रकरण  पुण्यासह देशभरात चांगलेच गाजले. या प्रकरणानंतर राज्यातील विविध सरकारी खात्यात बोगस प्रमाणपत्रे सादर करुन नोकरी मिळवल्याची प्रकरणे बाहेर येऊ लागले आहेत. पुणे महापालिकेतील सहा अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.  

राज्यातील प्रत्येक सरकारी खात्यात बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळविल्याची माहिती विविध संघटनांकडून बाहेर काढली जात आहे. त्यानुसार संबंधित विभागांना तक्रारी दाखल केल्या जात आहेत. त्यानुसार प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे शहर आणि आरपीआय यांनी याबाबत तक्रार केली आहे. आकाश ढेंगे यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास संबंधितांना नोकरीतून बडतर्फ केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

ढेंगे यांनी ८ ऑक्टोंबर २०१६ रोजी कनिष्ठ अभियंतापदासाठी परीक्षा दिली होती. त्यावेळी या पदासाठी तीन वर्ष अनुभवाची अट होती. त्यावेळीदेखील त्यांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच याप्रकरणी महापालिकेकडे तक्रारदेखील करण्यात आली आहे.

ढेंगे यांनी डिप्लोमा नंतर लगेचच बीई सिव्हिलसाठी सांगली येथील वालचंद कॉलेज येथे २१ जून २०१३ ते १ ऑगस्ट २०१६ या कालावधीत शिक्षणासाठी होते. हे शिक्षण नियमित माध्यमातील होते. याच कालावधीतील अनुभवाचे प्रमाणपत्र ढेंगे यांनी पुणे महापालिकेकडे सादर केले आहे. चाकण एमआयडीसीतील निघोज मराठे इंडस्ट्रीत ढेंगे हे नोकरीला नव्हते. त्यामुळे ढेंगे यांनी अनुभवाचे बोगस प्रमाणपत्र देवून पालिकेची फसवणूक केल्याची तक्रार महापालिका आयुक्ताकडे करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे तक्रार?
आकाश  ढेंगे यांनी दाखल केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आहे. ते ५ जानेवारी २०१७ रोजी दिव्यांग मधुन पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदावर भरती झालेले आहेत. पुणे महापालिकेत ढेंगे हे प्रत्यक्षात २ फेबुवारी २०१७ रोजी प्रत्यक्ष कामावर रूजू झाले.  पालिकेच्या सेवेत रूजू झाल्यापासुन आतापर्यंत केवळ दीड वर्षाचा वाद वगळता ढेंगे हे मलनिस्सारण विभागातच कार्यरत आहेत. ढेंगे यांचाकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्रे आहेत. ही दोन्ही दिव्यांग प्रमाणपत्रे छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) जिल्हा रुग्णालयातून मिळालेली आहेत. त्यातील पहिले दिव्यांग प्रमाणपत्र २१ डिसेंबर २०१६ रोजीचे असून त्यावर दिव्यांगत्वाचे प्रमाण ६३ टक्के आहे. दुसरे प्रमाणपत्र २० जानेवारी २०१७ रोजीचे असून त्यावर दिव्यांगात्वाचे प्रमाण ५५ टक्के आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही प्रमाणपत्रे एकाच डॉक्टरांनी दिलेली आहेत. त्यामुळे ही प्रमाणपत्रे बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे.  |

जात प्रमाणपत्रही अवैध असल्याचा आरोप?
ढेंगे यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी दिव्यांग आरक्षणातून महापालिकेची नोकरी मिळाली होती. कनिष्ठ अभियंता  ७५ टक्के सरळसेवा या संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही पडताळणीसाठी विधानभवनातील मागासवर्ग कक्षाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे जात प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. त्यावर कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातीचा दावा सिद्ध होत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने पुणे महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी राज्यसरकारच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मार्गदर्शनपर आदेश मिळण्याबाबत १३ सप्टेंबर २०२२ रोजी पत्र व्यवहार केला आहे. मात्र त्याबाबत अदयापही कोणतेही आदेश आलेले नाहीत.

काही संस्था, संघटनांकडून महापालिकेतील सहा कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर नोकरी मिळवल्याची तत्कार दिव्यांग कल्याण आयुक्ताकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार संबंधित विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बोगस प्रमाणपत्राबाबत ज्या काही तक्रारी येतील, त्यांची सखोल चौकशी केली जाईल.
- पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Share this story

Latest