विविध पक्षांच्या शक्तिप्रदर्शनामुळे नागरिकांचा जीव टांगणीला

नव्याने बांधलेल्या इमारतीतील लिफ्टमध्ये पाऊण तासापेक्षा अधिक काळ आठजण अडकून पडले होते. या सर्वांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सोमवार पेठेतील ‘विठ्ठल शांती’ या इमारतीमध्ये घडली.

वाहतूक कोंडीने अग्निशामक दलाची कोंडी

बिघाडामुळे नव्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकले आठजण, वाहतूक कोंडीने अग्निशामक दलाची कोंडी

नव्याने बांधलेल्या इमारतीतील लिफ्टमध्ये पाऊण तासापेक्षा अधिक काळ आठजण अडकून पडले होते. या सर्वांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सोमवार पेठेतील ‘विठ्ठल शांती’ या इमारतीमध्ये घडली. दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवस्तीत दोन सभा आयोजित केलेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीत बदल केला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका अग्निशामक दलाला बसला. अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला. राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शनमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता.  

अग्निशमन जवान वाहतूक कोंडीत 

अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, ९९ सोमवार पेठ या ठिकाणी नव्यानेच ‘विठ्ठल शांती’ नावाची इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप लिफ्टचे पासिंग झालेले नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या लिफ्टमध्ये गुरुवारी दुपारी आठजण बसले होते. लिफ्ट सुरू झाल्यानंतर ती ग्राऊंड फ्लोअरला बंद पडली. त्यामुळे सर्वजण अडकून पडले. लिफ्टमधून कोणालाही बाहेर पडता येत नव्हते. दरम्यान, नागरिकांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. लोहियानगर मुख्यालयातील गाडी तत्काळ रवाना करण्यात आली. मात्र, वाहतूक कोंडीमध्ये हे जवान अडकले. कशीबशी वाट काढत नेहरू रस्त्याने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

लिफ्टची पाहणी करून कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडण्यात आला. लिफ्ट अचानक सुरू होण्याची भीती असल्याने सर्वांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. यामध्ये १४ वर्षांच्या मुलापासून ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. यात तीन महिला आणि पाच पुरुष अडकले होते. या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने सर्वांनी जवानांचे आभार मानले. या बचाव कार्यात स्टेशन ऑफिसर रामटेके, तांडेल शफिक सय्यद, चालक हनुमंत कोळी, विनायक माळी, कल्पेश साळवे, दत्ता बाभळे, आशिष लहाने, हर्षद सोनवणे, शुभम सोनवणे, भूतकर यांनी सहभाग घेतला.

तब्बल ५० मिनिटे प्रवास 

अग्निशामक दलाला साधारण अडीचच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. साधारणपणे २ वाजून ३७ मिनिटांनी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळाकडे जायला निघाली. ही गाडी ३ वाजून २४ मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या गाडीला लोहियानगरमधून सोमवार पेठेत जाण्यासाठी तब्बल ५० मिनिटे लागली. विशेष म्हणजे सभेसाठी ‘केईएम हॉस्पिटल’मध्ये कसबा अग्निशामक दलाची गाडी ‘स्टँड बाय’ ठेवण्यात आलेली होती. ही गाडी उपलब्ध झाली असती तर लवकर मदत पोहोचवता आली असती. सुदैवाने लोहियानगरच्या मुख्य केंद्रामधून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्वांची सुटका केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest