पिण्याचे पाणी बांधकामाला ? पाणी पुरवठा विभागाले केले हात वर, पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला करावे लागणार नियोजन
पुणे: पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरु नये, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार शहरातील बांधकामांना सांडपाणी प्रकल्पात प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापरता येणार आहे. मात्र या पाण्याची मागणी मे महिन्यापेक्षा आता घटली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी बांधकामाला वापरले जात आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याकडे पाणी पुरवठा विभागाने डोळेझाक केली असून बांधकाम विभागावर जबाबदारी ढकलली आहे.
महापालिकेने केलेल्या मागणीपेक्षा कमी पाण्याचा कोटा जलसंपदा विभागाने मान्य केला आहे. त्यात यंदा पुण्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या वर्षी पेक्षा तुलनेने पाणीसाठी कमी आहे. त्यामुळे महापालिकेला शहराच्या लोकसंख्येचा विचार करुन पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची भीषणता जाणवण्याची भीती आहे. तरी सुध्दी पाणी पुरवठा विभागाच्या अद्याप कोणतेच नियोजन नसल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेला अशा परीस्थितीत पुढील वर्षी ऑगस्ट महीन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. उन्हाळा आणि त्यानंतरच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाढत जातो. यापार्श्वभुमीवर यंदा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मार्च महिन्यात आदेश काढत शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना तसेच विकासकामांना महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पात शुध्द केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले होते. मात्र, हा आदेश केवळ उन्हाळया पुरताचा मर्यादित राहिला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळयात दिवसाला तब्बल 75 टॅंकरच्या फेऱ्या होत होत्या. ही संख्या आता 15 ते 20 टॅंकर प्रतीदिन झाली आहे. शहरासह उपनगर भागात सुमारे ५० लाख चौरस फुट इतक बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. तसेच उपनगर भागात देखील छोट्या इमारतींची बांधकामे सुरु आहेत. असे असताना शुध्द केलेल्या सांडपाण्याची मागणी अचानक कमी झाल्याने अनेक प्रश्नांना उधाण आले आहे.
दरम्यान, आता पर्यंत या 5 कोटी 61 लाख लीटर शुध्द केलेले सांडपाणी बांधकामांना देण्यात आले असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेने नऊ सांडपाणी प्रक्रीया केंद्राच्या ठिकाणी हे पाण्याचे पॉईंट सुरू केलेले असून यासाठी खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून 146 टॅंकर उपलब्ध करून दिलेले आहेत.
१ मे रोजी काढला होता आदेश...
महापालिकेने 1 मे पासून शहरात बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरणे बंद करण्याचे आदेश काढत सांडपाणी वापरणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर, ऐन मे महिन्यात हे आदेश काढल्याने या टॅंकरच्या पाण्याची मागणी वाढली. त्यानंतर मात्र जून पासून ती पुन्हा कमी होत गेली आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी शुध्द सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग तसेच बांधकाम विभागाकडून याबाबत तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, या दोन्ही विभागांनी गेल्या सहा महिन्यात एकदाही ही तपासणी करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही बांधकाम विभागाची जबाबदारी असल्याचे सांगत हात वर केले आहेत. तर बांधकाम विभागाकडेही अशी तपासणी केल्याची कोणतीही माहिती नाही.