संग्रहित छायाचित्र
राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वच पक्ष, नेते, उमेदवार हे सभा आणि मेळावे घेताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांच्याशी 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्न, बेरोजगारी, गुन्हेगारी, शैक्षणिक प्रश्न यांसारख्या विषयांवर आपले मत मांडले.
बालपणाविषयी बोलताना डॉ. चलवादी म्हणाले, इंदिरानगर बर्माशेल येथील वस्तीत माझा जन्म झाला. या वस्तीत अनेक जातीधर्माचे लोक ऐक्याने राहायचे. यामध्ये बौद्ध, लमान, वाल्मिकी, मुस्लिम, चर्मकार समाजाचे लोक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून माझ्या वडिलांनी मला कॉन्व्हेंट शाळेत शिकवले. माझे वडील शिकलेले नव्हते. त्यांनी मला चांगले शिक्षण देवून आयुष्यात काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा दिली. मी उच्च शिक्षण घेतले. इतकेच नाही तर माझ्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठीहे मी आग्रही राहिलो. राजकारणात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली याबद्दल बोलताना डॉ. चलवादी म्हणाले, माझ्या वस्तीत अनेक समस्या आहे. अनेक नेतेमंडळी वस्तीतल्या लोकांचा 'युज अँड थ्रो' गोष्टी करायचे. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की जन्म एकदाच मिळतो. आपल्यासोबत काही येत नाही. गोरगरीब, दलित, शोषित, वंचित लोकांसाठी तू काहीतरी करायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिण्याच्या आधी माणसांपेक्षा जनावरांना इथे किंमत होती. बहुसंख्य लोक शोषित होते. म्हणून माझ्या वडिलांनी अशा लोकांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. याच दृष्टिकोनातून १९९७ साली मी निवडणूक लढलो. बर्माशेल वस्तीतल्या लहान-मोठ्या लोकांनी रस्त्यावर उतरून मला प्रोत्साहन दिले. त्यानंतर जनतेच्या सेवेसाठीच जगण्याचे मी ठरवले.
२००२ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याचा अनुभव सांगताना डॉ. चलवादी म्हणाले, २००२ साली मी प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलो. धानोरी, कळस विद्यानगर या तिन्ही ग्रामपंचायत प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळी काम करायला मोठा स्कोप होता. लोकांनी खूप प्रेम दिले. त्यावेळी मी नारा दिला होता. धानोरी परिसरात कुठल्याही माता-भगिनीच्या डोक्यावर हंडा दिसला अथवा कोणाच्या सायकलला कॅन दिसला तर मी त्याला पाच हजार एक रुपये भेट देईल, असा संकल्प केला होता. त्या काळी मी टँकर आणि पाणी प्रश्न मिटवण्याचे काम केले होते. तसेच त्यावेळी विश्रांतवाडीमध्ये झोपडपट्टीचा एक फार मोठा प्रश्न होता. त्यावेळी मी लोकांना सांगितले होते की मी घर बांधणारा माणूस आहे घर तोडणारा नाही. असे अनेक प्रश्न मी मार्गी लावले. शैक्षणिक, रस्त्याची, समाजमंदिराची, सीसी रोड, ड्रेनेज, गार्डन, धार्मिक स्थळांची कामे मी मार्गी लावली. विद्यानगरमध्ये विद्येचे संकुल उभे करण्याचा नारा दिला होता. ते पुढे पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून उभे राहिले. महानगरपालिकेच्या अनेक शाळांची बांधकामे तसेच गुंठेवारीचे प्रश्न मिटवण्याचे काम केले.
२००७ मध्ये डॉ. हुलगेश चलवादी यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, सुरुवातीपासूनच माझ्यामध्ये एक आक्रमकता होती. तिला काँग्रेसमधे दाबण्यात येत होते. माझ्या शाळा पाडण्यात आल्या. मी पुण्याचा महापौर होणार होतो. मात्र मला त्यावेळी डावलण्यात आले. मी जन्मत:च आंबेडकरवादी असल्याने गांधीवादी काँग्रेसमध्ये मला गुदमरल्यासारखे झाले. त्यानंतर मी मायावती यांच्या भेटीसाठी गेलो. त्यांचे उत्तर प्रदेशातील काम बघून भारावून गेलो. त्यानंतर मी बहुजन समाज पक्षात आलो. या पक्षाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील लोक वर्षभरात कोट्यवधी रुपये निव्वळ पाण्याच्या टँकरसाठी खर्च करतात. वडगाव शेरी हा पुणे स्मार्ट सिटीमधील एक मतदारसंघ आहे. मात्र अजूनही या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच पाण्याचे मीटर लावण्याचे काम सुरू झाले आहे. आपण लोकांना पाणीही मोफत देवू शकत नाही का? असा सवाल डॉ. चलवादी यांनी केला. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी, संरक्षणासाठी राजकारणी लोक गुन्हेगार जन्माला घालतात. या गुन्हेगारांना आळा घालण्याचा प्लॅन माझ्याकडे आहे. त्यांना आळा घातला तरच आपल्या महिला-भगिनी, व्यावसायिक सुरक्षित राहतील. वडगावशेरी भयमुक्त बनवायची आहे, असे ते म्हणाले. माझी कोणाशी स्पर्धा आहे हे मला माहिती नाही. परंतु मी सतत काम करणारा माणूस आहे. जनतेचा सेवक आहे. जनतेला मालक मानून त्यांची सेवा करणारा नोकर आहे. त्यांच्या सेवेसाठीच माझा जन्म झाला आहे. जनतेने एक संधी दिली तर त्या संधीचे मी सोने करून दाखवेन. माझा जन्म झोपडीत झाला. आता मी एका पंचतारांकित घरामध्ये राहतो. झोपडीपासून ते उच्चभ्रू घरापर्यंतचे प्रश्न मला माहिती आहे. मी उद्योग व्यवसायामध्ये असलो तरी माझे पाय जमिनीवर आहे. जनतेने कोणाला निवडून द्यायचे हे ठरवले आहे.
लोक माझ्या कामाचे कौतुक करतात. त्यांना मदत केल्यावर कृतज्ञता व्यक्त करतात. त्यातून मला ऊर्जा प्राप्त होते. मला इतके प्रेम आणि समर्थन मिळेल याची कल्पना नव्हती. मतदारसंघातील भयाचे वातावरण, तरुणांमधील कर्जबाजारीपणा यामुळे मी निवडणूक लढवत आहे. अनेक लोकांनी त्यामुळे आत्महत्या केली आहे. वडगावशेरी मतदारसंघाला भयमुक्त करायचे आहे. दर्जेदार शिक्षण केंद्र म्हणून वडगावशेरीचा विकास घडवायचा आहे. मी शिक्षण क्षेत्रातील असल्यामुळे मुले कसे घडवायाचे हे मला माहिती आहे. त्याप्रमाणेच मतदारसंघही मी घडवणार आहे . मतदारसंघाला दहशतीच्या वातावरणापासून मुक्त करायचे आहे, असे डॉ. चलवादी यांनी सांगितले. १७ नोव्हेंबरला येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या मैदानावर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांची सभा होणार असल्याची माहिती डॉ. चलवादी यांनी दिली. ते म्हणाले, मायावतीजी यांनी माझा प्रचार करण्यासाठी सभा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मायावती यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जोशपूर्ण वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, वडगावशेरी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, टँकर प्रश्न, वाहतूककोंडी, कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, जमिनीचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देवून वडगावशेरीत एक वेगळा पॅटर्न राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.