पुणे : वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पार्टीचे (बसपा) अधिकृत उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांनी मतदारसंघातील मतदार, तरुणांसाठी तसेच गोरगरीबांसाठी दशसुत्री कार्यक्रम तयार केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत आरोग्य विमा, युवकांसाठी मोफत लॅपटॉप, दरवर्षी २५ हजार रोजगार निर्मिती, नवीन शाळा व कॉलेज यांची निर्मिती, महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइन नंबर, जनतेच्या सुरक्षिततेसाठी दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे, २४ तास मोफत पाणी, विविध समाजासाठी बहुउद्देशीय हॉल, गरिबांसाठी पाचशे रुपयात गॅस सिलिंडर, प्रतिवर्षी एक लाख झाडे लावणार असा संकल्प घेत चलवादी यांनी मतदान करण्याची साद घातली आहे.
वडगावशेरी मतदारसंघात डॉ. चलवादी यांचा प्रचार जोरात सुरु आहे. सर्वत स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. चलवादी हे संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच नागरिकांना प्रत्यक्ष भेट देत प्रचार केला जात आहे.
मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बसपा हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे मतदारसंघातील सुज्ञ मतदार नक्कीच संधी देतील, याची खात्री व विश्वास आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता १० गती हा कार्यक्रम हाती घेणार आहे. या १० गतीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे बहुजन समाज पार्टिचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांनी सांगितले.
वडगावशेरी मतदारसंघात दुरंगी लढत होण्याची चर्चा सुरू होती. मात्र बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांनी प्रचारात चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे निवडणूक तिरंगी होणार आहे. चलवादी हे विकासाची दशसूत्री मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान मतदारसंघात ठिकठिकाणी बाईक रॅली काढली जात असून मतदारांना मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे.