सीएचबीधारकांची दिवाळी पगाराविनाच?

उच्च शिक्षण संचालनालय, सार्वजनिक विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयांमधील कार्यालयीन दिरंगाईचा फटका तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबीधारक) हजारो प्राध्यापकांना बसणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून मानधन म्हणून दिला जाणारा पगार न मिळाल्यामुळे दसरा तर अंधारात गेला. आता त्यांची दिवाळीदेखील पगाराविनाच जाण्याची चिन्हे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 23 Oct 2024
  • 10:49 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा प्रश्न गंभीर, महाविद्यालयांकडून प्रस्तावात दिरंगाई, विद्यापीठ प्रशासनाकडून चालढकल

उच्च शिक्षण संचालनालय, सार्वजनिक विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयांमधील कार्यालयीन दिरंगाईचा फटका तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबीधारक) हजारो प्राध्यापकांना बसणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून मानधन म्हणून दिला जाणारा पगार न मिळाल्यामुळे दसरा तर अंधारात गेला. आता त्यांची दिवाळीदेखील पगाराविनाच जाण्याची चिन्हे आहेत.

जून महिन्यापासून थकीत मानधनाचा विषय प्रलंबित आहे. येत्या रविवारपासून (दि. २७) दिवाळीच्या सुट्या लागणार आहेत. राज्यभरातील हजारो सीएचबीधारक प्राध्यापकांसह त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक टंचाई आणि उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.

राज्य शासननिर्णयानुसार,सीएचबीधारकांना नियुक्ती नऊ महिन्यांची असते. त्यातही निवड प्रक्रिया उशिराने होते. यातील अडीच ते तीन महिने सत्र परीक्षांचे असतात. परीक्षा काळातील मानधन मिळत नाही. हे दिवस वजा जाता शिकविण्यासाठी पाच ते साडेपाच महिने उरतात. सीएचबीधारकांनी शिकविले, तरच त्यांना मानधन देण्यात येते. महाविद्यालयांकडून याबाबतचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठवले जातात. त्यानंतर त्यासाठी शासन निधीतून तरतूद केली जाते. परंतु, चालू शैक्षणिक वर्षात जूनपासून आजतागायत एकाही सीएचबीधारकाला मानधनाची रक्कम मिळालेली नाही.

ऑक्टोबर महिना संपण्याच्या मार्गावर आहे. दिवाळीसारखा मोठा सण एक आठवड्यावर येऊन ठेपला असूनसुद्धा गेल्या ३ ते ४ महिन्यांचे मानधन सीएचबीधारकांना मिळालेले नाही. अशा स्थितीत कुटुंबातील खर्च, सण-उत्सव यासाठी कुठून तजवीज करायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

शासनाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती वेळेत केली जात नाही. किंबहुना महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर मान्यता देण्यासाठी दिरंगाई केली जाते. त्यामुळे विभागीय सहसंचालक कार्यालयांना मानधन वेळेत पाठवता येत नाही त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना विनावेतन पाच ते सहा महिने कर्ज काढून संसार करावा लागतो. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या बाबतीत शासन नियमाचे उल्लंघन होते, अशा अधिकाऱ्यांच्या वर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

 शिक्षणक्रांती संघटनेचे राज्य समन्वयक प्रा. नितीन घोपे म्हणाले, ‘‘आतापर्यंत १४ नोव्हेंबर २०१८, १७ ऑक्टोबर २०२२ आणि २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार सीएचबींचे मानधन, निवड, मान्यता, बिल प्रस्ताव, मानधन अदायगी इत्यादी प्रक्रियेचे स्पष्ट वेळापत्रक दिले आहे. तरीसुद्धा महाविद्यालये, विद्यापीठे आणि सहसंचालक कार्यालये नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करत असतात. राज्यातील हजारो प्राध्यापक मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. तातडीने त्याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल.’’

आमची दिवाळी अंधारात जाणार आहे. हजारो प्राध्यापकांना या शैक्षणिक वर्षात अनेक महिन्यापासून मानधन नाही, म्हणून ते बिन पगारी अध्यापन करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये शिक्षक मान्यता मिळालेल्या असून देखील मानधन मिळालेले नाही सदर विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे तरच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा सीएचबी तत्वावर पुण्यात कार्यरत डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली.  

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती अध्यक्ष आणि पीएचडी संशोधक राहुल ससाणे म्हणाले, ‘‘सीएचबी तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक प्राध्यापकांचे पगार शिक्षण संस्था वेळेवर करत नाहीत. अध्यापनाव्यतिरिक्त या प्राध्यापकांकडून महाविद्यालयाची इतर कामेदेखील करून घेतली जातात. नॅकच्या नावाखाली राबवून घेतले जाते. प्रत्यक्षात सीएचबीधारकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्याचे काम महाविद्यालये, प्राचार्य आणि संस्थाचालक करत आहेत.’’

प्राध्यापकांच्या नियुक्ती या वेळेवर होत नसल्यामुळे विद्यापीठातून मान्यता मिळण्यास उशीर होतो.नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय नावालाच आहे. जेमतेम वर्षातून केवळ सहा मिहिनेच मानधन मिळते.त्यामुळे बेरोजगारीचा सामना करावा लागतो.याकडे  विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे नांदेडचे प्रा. शरद वाघमारे म्हणाले.

पन्हाळा (कोल्हापूर) येथील डॉ. अस्लम अत्तार म्हणाले, ‘‘तासिका तत्त्वावर मी ८-९ वर्षे काम करत आहे. घर चालवण्यासाठी मला चिकन दुकान चालवावे लागते. कारण मानधन कमी आहे आणि वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मी रोज सायंकाळी पार्टटाईम चिकन दुकान सुरू केले आहे. ना विमा, ना फंड, आरोग्य सुविधा नाहीत अशा क्षेत्रात आम्ही काम करत आहोत.’’

या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सीएचबी प्राध्यापकांचे मानधन दर

अभ्यासक्रम -

कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) - लेखी ९०० रुपये - प्रात्यक्षिके ३५०

कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) - लेखी १,००० रुपये - प्रात्यक्षिके ४५० रुपये

दर महिन्याच्या २ तारखेला प्रस्ताव मिळणे अपेक्षित

दर महिन्याला सीएचबीधारकांना नियमितपणे मानधन मिळाले, असे कधीच घडले नसल्याचे शिक्षणक्रांतीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  ३० ऑगस्ट २०२४ रोजी उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून स्पष्ट निर्देश दिले होते की, मानधनाचे प्रस्ताव दर महिन्याच्या २ तारखेला सादर करावेत आणि ते परिपूर्ण असावेत.

तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधनाचे प्रस्ताव महाविद्यालयांकडे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता सर्व प्राचार्यांनी घ्यावी, अशी सूचनाही पत्रात केलेली होती.

६० मिनिटांची तासिका

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान तसेच दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रति तासिका कालावधी ६० मिनिटांचा आहे. लेखी आणि प्रात्यक्षिक मानधन दरात फरक करून एक प्रकारे भेदाभेद शासनाने केला आहे, असे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे म्हणणे आहे, हा भेदसुद्धा लवकरात लवकर मिटविला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest