संग्रहित छायाचित्र
देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे मल्ल खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराइट कायद्यानुसार दाखल केलेल्या दाव्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समन्स बजाविण्यात आले आहे.
खाशाबा चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असताना मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याचा आक्षेप सदर याचिकेद्वारे घेण्यात आला आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रॉडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.
खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क असलेल्या संजय दुधाणे यांनी हा दावा दाखल केला आहे. चित्रपटाची निर्मिती आणि प्रदर्शनासाठी बंद आणावी, अशी मागणी करणारा दावा दुधाणे यांनी अॅड. रवींद्र शिंदे तसेच अॅड. सुवर्णा शिंदे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. दाव्याची दखल घेत न्यायालयाने मंजुळे, निर्माती ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो व आटपाट प्रॉडक्शन यांना आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठविले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.
संजय दुधाणे यांनी दावा दाखल केल्यानंतर मंजुळे यांची बाजू मांडणाऱ्या ॲड. केदार धोंगडे, ॲड. शिवम निंबाळकर यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर काही बोलता येणार नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे नागराज यांच्याशी फोनद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
काय आहे वाद?
खाशाबा चित्रपटाची मूळ कथा संजय दुधाणे यांची असल्याचा दावा केला जात आहे. नागराज मंजुळे यांनी रणजित जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याचे दुधाणे यांचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये मंजुळे यांनी चित्रपटाबाबत रणजित जाधव यांच्याशी करार केला होता. मूळात रणजित जाधव यांनीच ३० ऑगस्ट २०१३ रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही माझी असल्याचे घोषित केले होते. आता जाधव यांनी आपल्याला डावलून संमती करार केल्याचा आक्षेप दुधाणे यांनी नोंदवला आहे. चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने मी नागराज मंजुळे यांना नोटीस पाठवली होती, असे त्यांनी दाव्यात नमूद केले आहे.
पुस्तकाला मिळालाय सर्वोत्कृष्ट क्रीडा पुस्तकाचा पुरस्कार
संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे खाशाबांवरील पहिलेच आणि एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकाची विक्रमी १५ वी आवृत्ती प्रकाशित झाली असून, या पुस्तकाला २००८ मध्ये सर्वोत्कृष्ट क्रीडा पुस्तकाचा राज्य पुरस्कारही मिळाला आहे. २००४ मध्ये नववी आणि २०१५ मध्ये सहावीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे.