संग्रहित छायाचित्र
निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक तयारीबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr. Suhas Divse) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे कविता द्विवेदी, दिपक सिंगला आणि अजय मोरे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुण्यातील लोकसभा निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी मोठे विधान केले.
डॉ. दिवसे म्हणाले, ‘मतदान यंत्र क्षमतेनुसार एका लोकसभा मतदारसंघात ३८४ उमेदवार उभे राहू शकतात. त्याला २४ बॅलेट युनिट जोडू शकतो आणि मतदान ईव्हीएमवर (EVM) घेता येऊ शकेल. मात्र, त्यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास बॅलेट पेपरवर (Ballot Paper) मतदान घ्यावे लागेल. अशी परिस्थिती येईलच असे आताच सांगता येणार नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास मतदानासाठी जास्त मनुष्यबळ लागणार. मात्र, मतमोजणीवेळी जास्त टेबल लावावे लागतील. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर नेमक्या उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर गरज भासल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेतले जाईल. सद्य:स्थितीत जास्त उमेदवार निवडणुकीला उभे राहतील, ही बाब जर-तरची आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यास संबंधित मतदारसंघापुरता वेगळा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेने घेतला जाईल.’
पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ असून बारामतीचे मतदान ७ मे, तर पुणे, शिरूर आणि मावळचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता नाही. अंतिम मतदारयादी तयार करताना अनेक दुबार आणि मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारांची तपासणी करताना अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत मतदारांची स्वतंत्र यादी केली आहे. त्यामुळे दुबार मतदान होणार नसल्याचा दावाही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी यावेळी केला.