संग्रहित छायाचित्र
लोकसभा निवडणुकीचा उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि गैरप्रकारांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण आणि चित्रीकरण पथके कार्यरत राहणार आहेत.
शिवाय उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हीडीओ चित्रीकरणही केले जाणार असून, त्याची पाहणीही केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पथके नेमण्यात येत असून, लोकसभा निवडणुकीसाठी चित्रीकरण पथके सज्ज असणार आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून देण्यात आली आहे. कार्यालयाकडून खर्च सनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात येते. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यापूर्वीच लागू झाली आहे. या आचारसंहितेचे सर्व संबंधित घटकांनी काटेकोरपणे पालन करावे. मतदारांसाठी असलेल्या सोयीसुविधा, मतदान केंद्राची रचना तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रासंदर्भात विशेष उपाययोजना याबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
व्हीडीओ सर्वेक्षण
भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हीडीओ सर्वेक्षण पथक, व्हीडीओ पाहणी पथक, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणिकरण समिती, जिल्हा नियंत्रण कक्ष आणि तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात
आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मदत
आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.
पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सी व्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करणे आदी स्वरूपांची कामे ही पथके करणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून काय केलं जाणार आहे?
मतदान केंद्रावर पोहोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
मतदानाची तारीख लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन केले जाईल.
सर्व मतदान केंद्रांवर प्रथमोपचार सुविधा देताना सोबत एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त केला जाईल.
आवश्यक ती औषधे सर्व मतदान केंद्रावर ठेवण्यात येतील.
निवडणूक काळात होणाऱ्या हालचालींवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे निवडणूक काळात घालून दिलेल्या नियम आणि अटींचे सर्वच राजकीय पक्षांनी काटेकोर पणे पालन करायला हवे. कुठेही वादाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. जिल्ह्यात कारवाईसाठी भरारी पथके सज्ज झाली आहेत. आणखीन काही पथके नेमण्याचे काम चालू आहे. जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या राजकीय पक्षांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- सुहास दिवसे, जिल्हाधिकारी, पुणे