Bar on street
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
शहरात आता वाईन शॉपच्या बाहेरच अनधिकृत ओपन बार सुरू झाले आहेत. वाईन शॉपमधून बाटल्या घेऊन रस्त्यावरच मद्यपी त्यांची मैफल बसवत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत असून, अनेक वेळा भांडणाचे प्रसंग ओढवत आहेत. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचे मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू असल्याचे दिसत आहे. कारण पोलीस ठाणी आणि चौक्यांपासून हाकेच्या अंतरावर हे ओपन बार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये बहुतांश वाईन शॉपच्या बाहेर रस्त्यांवर असलेल्या हातगाड्यांवरच सर्रासपणे दारू पिण्याचे प्रकार वाढले आहेत. रावेत येथील एका वाईन शॉपमधून दारू घेतल्यावर तेथून पुढे काही अंतरावर रस्त्यावरील पत्राशेडमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून नुकताच एका युवकाचा खून झाला. रस्त्यावर दारू पिणाऱ्यांकडून सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
भोसरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या दापोडी चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका वाईन शॉपबाहेर अशाच प्रकारे रस्त्यावर उभे राहून दिवस-रात्र दारू पिणारे दिसतात. या वाईन शॉपच्या समोरील बाजूस लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) आहे. या महाविद्यालयात देशासह परदेशातील लष्करी अधिकारी प्रशिक्षणासाठी येत असतात. तसेच, तेथे जवळच महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे असून, येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते.
दापोडी चौकीपासून पुढे पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य चौकात आल्यावर एक वाईन शॉप, देशी दारू आणि त्याच्याच शेजारी ताडी विक्री अशी तीन दुकाने आहेत. या दुकानांना लागून पिंपरी कॅम्प, गाव आणि काळेवाडी-रहाटणी या दिशेला जाणाऱ्या पीएमपीएमएल बसचा थांबा आहे. या थांब्यावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. या दारू दुकानांबाहेर एक-दोन नव्हे तर पाच हातगाड्या लागत असून, या गाड्यांवर सर्रासपणे मद्यपी दारू पिताना दिसतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच हे सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.
पिंपरी पोलीस ठाणे हे चिंचवड रेल्वे स्थानकासमोर असून, या पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एक वाईन शॉप आहे. या वाईन शॉपबाहेरही हातगाड्यांवर दारू पिणाऱ्यांची गर्दी आता सर्वसामान्यांसाठी नित्याची झाली आहे. रावेत येथे नुकताच खून झाला. तेथील वाईन शॉपही पोलीस ठाण्याच्या समोरच आहे. तेथून दारू घेऊन काही अंतर पुढे जाऊन एका पत्राशेडमध्ये बसून दारू पिण्याची सोय आहे. या पत्राशेडमध्ये झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून युवकाचा खून करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर ‘ओपन बार’ मांडलेले लोक पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिसत नाहीत का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पोलीस ठाणी आणि पोलीस चौकींपासून हाकेच्या अंतरावर दारू विक्रीची अधिकृत दुकाने आहेत. असे असले तरी पोलीस चौकी किंवा ठाण्यांच्या आसपास ही दुकाने नसावीत, असा कोणताही नियम नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, पोलीस विभागाकडून दारू दुकाने सुरू होताना त्याबाबत आक्षेप का घेण्यात आला नाही, हेही न उलगडणारे कोडे आहे.
वाकड दत्तमंदिर रस्त्यावरही पोलीस ठाण्याच्या शेजारील इमारतीत वाईन शॉप असून, तेथून विकत घेतलेली दारू काही अंतर पुढे असलेल्या झोपडपट्टीच्या प्रवेशव्दारावरील हातगाड्यांवर पिणारे दिसतात. नागरिकांना दिसणारा हा प्रकार पोलिसांना का दिसत नाहीत, असाही प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. रस्त्यावर दारू पिऊन धुंद झालेल्यांकडून महिलांची छेडछाड करणे, आपापसात हाणामाऱ्या, शिवीगाळ करणे हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत.
वाईनशॉप, हातगाडीवाल्यांचे हात झटकले
दुकानाबाहेर दारू पिणाऱ्या लोकांबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. आमच्या दुकानाबाहेर काय चालू आहे त्याला आम्ही अटकाव करू शकत नाही, अशी भूमिका वाईन शॉपचालकांनी घेतली आहे. याचवेळी हातगाडीवाल्यांनीही हात वर केले आहेत. हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, आम्हाला उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. आम्ही या लोकांना येथे उभे राहून दारू पिऊ नका असे सांगतो. खाद्यपदार्थ घेऊन जा असे सांगितल्यावरही हे लोक इथे उभे राहून दारू पितात, त्याला आम्ही काय करणार, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.
अवैधरित्या चालणाऱ्या अशा गोष्टींवर आमच्याकडून सातत्याने कारवाई होत असते. आमच्या पथकाने नुकतीच पिंपरी-चिंचवड परिसरात कारवाई केली आहे. पोलीस ठाणे किंवा चौकीच्या बाजूला वाईन शॉप नसावे असा नियम नाही.
– चरणसिंग रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे
गृहसंकुलात असलेले व्यावसायिक गाळे भाडेतत्त्वावर देताना किंवा विक्री करताना तेथे दारू विक्री होणार असेल तर याबाबत शासनाने नियम तयार करण्याची आवश्यकता आहे. गृहसंकुलात व्यावसायिक गाळे कमी असतील तर गृहसंकुलात राहणाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते. मात्र, गृहसंकुलाशेजारी व्यावसायिक संकुल स्वतंत्र असल्यास विचारणा होत नाही आणि त्याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्यावर उभे राहून दारू पिणाऱ्या लोकांमुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन तेथून जावे लागते.
- दत्तात्रेय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन
मी काळेवाडी फाटा येथे नोकरी करते. त्यासाठी मला पिंपरी चौकातून बसने प्रवास करावा लागतो. या ठिकाणी दुपारी दीड-दोन नंतर रस्त्यावर उभे राहून दारू पिणाऱ्या लोकांची गर्दी झालेली असते. त्यांची सुरू असलेली शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या लोकांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
- वैशाली मदने, पीएमपीएमएल बस प्रवासी
रस्त्यावर भरणारे दर'बार'
संत तुकारामनगर चौकी ते बार २० मीटर
वाकड पोलीस ठाणे ते वाईन शॉप २० मीटर
पिंपरी पोलीस ठाणे ते वाईन शॉप १०० मीटर
दापोडी पोलीस चौकी ते वाईन शॉप १०० मीटर
आकुर्डी पोलीस चौकी ते वाईन शॉप १०० मीटर
रावेत पोलीस ठाणे ते वाईन शॉप १०० मीटर
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे ते वाईन शॉप २०० मीटर